माथेरानमध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; डिजिटल व्यवहार ठप्प; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

पावसाळा सुरू होताच माथेरानमध्ये वीज आणि पाण्याच्या समस्यांनी नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले होते. सध्या वीज आणि पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुरळीत झाला असला, तरी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
माथेरानमध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; डिजिटल व्यवहार ठप्प; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
माथेरानमध्ये मोबाईल नेटवर्कचा बोजवारा; डिजिटल व्यवहार ठप्प; दैनंदिन व्यवहारांवर परिणाम
Published on

चंद्रकांत सुतार/माथेरान

पावसाळा सुरू होताच माथेरानमध्ये वीज आणि पाण्याच्या समस्यांनी नागरिक व व्यावसायिक त्रस्त झाले होते. सध्या वीज आणि पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुरळीत झाला असला, तरी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटची समस्या मात्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या माथेरानमध्ये अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क पूर्ण क्षमतेने मिळत नसल्याने नागरिक, व्यापारी आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

माथेरानचा बहुतांश व्यवसाय पर्यटनावर अवलंबून आहे. हॉटेल, दुकाने, चहा-नाश्त्याच्या टपऱ्या तसेच खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून मोठ्या प्रमाणात UPI, GPay, PhonePe आणि मोबाईल बँकिंगद्वारे व्यवहार केले जातात. मात्र नेटवर्क नसल्याने डिजिटल पेमेंट अडकते. अनेक पर्यटकांकडे रोख रक्कम नसल्याने खरेदी किंवा खाद्यपदार्थांचे बिल चुकते करताना अडचणी निर्माण होतात. परिणामी ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वादाचे प्रसंगही घडत आहेत.माथेरान हे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असल्याने येथे अखंडित मोबाईल आणि इंटरनेट सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन नेटवर्क समस्येची पाहणी करावी आणि तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.

अनेक पर्यटक रोख पैसे जवळ ठेवत नाहीत. त्यामुळे ते ऑनलाइन पेमेंटवर अवलंबून असतात. मात्र नेटवर्क नसल्यामुळे पेमेंट होत नाही. यामुळे पर्यटक आणि दुकानदार यांच्यात वाद होतात. नेटवर्कच्या समस्येमुळे आम्हालाही गॅस बुकिंग करताना त्रास होतो. OTP वेळेवर न आल्याने बुकिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही.

रमाकांत तोरणे, सामाजिक कार्यकर्ते

logo
marathi.freepressjournal.in