

चंद्रकांत सुतार/ माथेरान
माथेरानमध्ये सध्या साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले असून, विशेषतः जुलाब, उलट्या, खोकला, पोटदुखी आणि मळमळ यांसारख्या आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. पावसाळ्यात विविध ठिकाणांहून वाहून येणारे पाणी, सांडपाणी तसेच दूषित पाण्याचे प्रवाह मुख्य जलप्रवाहात मिसळण्याची शक्यता असल्याने पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पावसाळ्यात अस्वच्छता, उघड्यावर विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि दूषित पाण्यामुळे विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. डासांच्या प्रादुर्भावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. तसेच दूषित अन्नपाण्यामुळे टायफॉईड, अतिसार, पोटदुखी, मळमळ आणि उलट्या यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. झुरळे व इतर कीटकांमुळेही खाद्यपदार्थ दूषित होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, माथेरानमध्ये सर्दी-खोकल्याच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. हे आजार संसर्गजन्य असल्याने एका व्यक्तीकडून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे आजारी व्यक्तींनी शक्यतो इतरांपासून अंतर ठेवावे आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. डॉक्टर यादव यांनी नागरिकांनी पाणी उकळून थंड करून प्यावे, शक्य असल्यास घरात योग्य फिल्टरचा वापर करावा आणि बाहेरील उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. पाणी उकळून प्यायल्याने अनेक जलजन्य आजारांचा धोका कमी करता येतो.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता
बी. जे. हॉस्पिटलमध्ये कर्मचारीवर्गाचीही कमतरता असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. काही कर्मचारी अनुदानातून नियुक्त करण्यात आले होते; मात्र वेतनवाढ न मिळाल्याने काहींनी नोकरी सोडल्याची माहिती समोर आली आहे. बी. जे. हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत यादव यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशीही रुग्णांची गर्दी
सध्या दररोज सुमारे ३० ते ४० रुग्ण साथीच्या आजारांच्या उपचारासाठी रुग्णालयात येत आहेत. रुग्णालयात सध्या १२ बेड उपलब्ध असूनही त्यापेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी येत असल्याचे चित्र आहे. रविवारच्या सुट्टीच्या दिवशीही रुग्णालय रुग्णांनी गजबजून गेले होते.