चंद्रकांत सुतार / माथेरान
पावसाळी हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात माथेरानने पर्यटकांनी ओसंडून वाहावं अशी अपेक्षा होती. मात्र शनिवारी रात्री अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील सर्वच यंत्रणा कोलमडल्या. रविवारी संध्याकाळपर्यंत वीज सेवा पूर्ववत झाली नव्हती. परिणामी, दैनंदिन जीवन, पर्यटन व्यवस्था आणि व्यावसायिक व्यवहार पूर्णत: कोलमडले होते. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली येथे M3 इनकमर फीडरवरील दोन्ही HT केबल्सवर जोरदार स्फोट (ब्लास्ट) झाला आहे. त्यामुळे संपूर्ण नेरळ-शेलू-माथेरान परिसरातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. वीज सेवा संध्याकाळपर्यंत पूर्ववत होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. वीज नसल्याने मोबाईल टॉवर्सही बंद पडले. त्यामुळे स्थानिकांचा व पर्यटकांचा एकमेकांशी संपर्क तुटला. अंधार, असमर्थता आणि मानसिक तणाव यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले. आजच्या काळात वीज हा जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र तीच नसेल, तर जीवन ठप्प होते, हे माथेरानमध्ये प्रकर्षाने दिसून आले.
अंधार, मानसिक त्रास, आर्थिक नुकसान, पर्यटकांचा रोष आणि स्थानिक व्यावसायिकांचे संकट यामुळे संपूर्ण माथेरान रविवारी अक्षरशः ‘अदृश्य’ वाटले. हॉटेलमधून रात्रीपासूनच जनरेटरचा आवाज घुमू लागला, तर कॉटेजमधील इन्व्हर्टर रविवारी सकाळपर्यंतच टिकले. त्यामुळे अनेक ठिकाणी अंधारातच पाहुण्यांनी रात्री घालवली. फ्रीजमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ खराब झाले. थंड पेय, डेअरी व दुग्धजन्य उत्पादनांचे मोठे नुकसान झाले. पावसाळी हंगामात अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी पर्यायी उपाययोजना, बॅकअप व्यवस्था असणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ई-रिक्षांवर ताण; पर्यटकांचा रोष
शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे माथेरानमध्ये अंदाजे १० ते १२ हजार पर्यटक आले होते. त्यांना आता पसंतीस पडणाऱ्या ई-रिक्षांवर अवलंबून राहावे लागले. मात्र लाईट नसल्याने केवळ १०-१२ ई-रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. दुपारी बहुतेक ई-रिक्षा बंद पडल्या आणि पर्यटकांनी नाराजीचा सूर चढवला.