
चंद्रकांत सुतार/माथेरान
जानेवारीनंतर प्रथमच माथेरानमध्ये पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. गेले दोन दिवस विशेषतः शनिवार व रविवारच्या सुट्टीचा लाभ घेत अनेक पर्यटकांनी माथेरानकडे धाव घेतली. त्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हॉटेल्स, कॉटेजेस, लॉजेस फुल्ल क्षमतेने भरले गेले.
गेल्या दोन दिवसांत अचानक वाढलेल्या गर्दीमुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण आला होता. दस्तुरीपासून पुढे चालत जावे लागले. काही पर्यटकांना राहण्याची व्यवस्था न मिळाल्याने माघारी फिरावे लागले. काहींना पावसात भिजण्याचा आनंद लुटायचा होता, मात्र पावसाची प्रतीक्षा निराशाजनक ठरली. तरीही, शार्लोट धबधब्याचा आनंद पर्यटकांनी मनमुराद घेतला. रविवारी सायंकाळी सहानंतर मात्र माथेरान पुन्हा शांत झालं. दोन दिवसांनी आपल्याला गोडवा देऊन मध गोळा करणाऱ्या मधमाशांसारखे हे पर्यटक परतीच्या वाटेला लागले. त्या गजबजाटानंतर आलेली ही शांतता माथेरानकरांना ‘चुकल्यासारखी’ वाटली.
शहराच्या गोंगाटातून दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी माथेरान हे पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. येत्या आठवड्यांत अधिक पावसाची शक्यता असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, असा विश्वास स्थानिक व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
पर्यटन व्यवसायाला चालना
हॉटेल व्यवसाय, हातगाडी अश्वचालक विक्रेते, स्थानिक दुकानदार, रिक्षाचालक आदींसाठी ही गर्दी आश्वासक ठरली. पावसाळा आणि वीकेंड टुरिझमच्या सुरुवातीला आलेल्या या गर्दीमुळे पुढील आठवड्यांतही पर्यटनवाढीची अपेक्षा आहे.
ई-रिक्षा व मिनी ट्रेनचा पर्यटकांना लाभ
शटल सेवामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला, तसेच ई-रिक्षा आणि मिनी ट्रेनचा पर्यटकांना लाभ झाल्याने परिसरात फिरणे सुलभ झाले आहे.