

माथेरान : डोंगररांगांमधून धावणारी आणि पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी 'माथेरानची राणी' आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहे. नेरळ-माथेरानदरम्यान धावणाऱ्या या ऐतिहासिक हिल रेल्वेला भविष्यात हायड्रोजन इंजिनाची ताकद मिळण्याची शक्यता आहे. २०२३-२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती.
नेरळ ते माथेरानदरम्यान सुमारे २१ किलोमीटरच्या अरुंदमापी मार्गावर धावणारी ही रेल्वे सध्या डिझेल इंजिनावर चालते. भविष्यात हायड्रोजन इंजिनाचा वापर झाल्यास पर्यावरण संवेदनशील माथेरानमध्ये धूर व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे मंत्रालयाच्या 'हायड्रोजन फॉर हेरिटेज' या महत्त्वाकांक्षी उपक्रमात माथेरान हिल रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे. माथेरानसह कालका-शिमला, दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, कांग्रा व्हॅली, बिलीमोरा-वाघई, पाताळपानी-कालाकुंड आणि मारवाड-गोरम घाट या हेरिटेज रेल्वेमार्गांचा या योजनेत समावेश आहे. टेकडीवरील थंड हवेचे ठिकाण असल्यामुळे माथेरानमध्ये राज्यासह देशभरातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यावेळी अनेक पर्यटक आपल्या कुटुंबकबिल्यासह, मित्रांबरोबर माथेरानच्या राणीने प्रवास करणे पसंत करतात. अत्यंत धीम्या गतीने चालणाऱ्या या ट्रेनमुळे आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेता येतो.
हरित ऊर्जेचा वापर
प्रत्येक हायड्रोजन ट्रेनसाठी सुमारे ८० कोटी रुपये, तर हायड्रोजन निर्मिती व इंधन भरण्याच्या सुविधांसाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज निर्माण होत असल्याने या तंत्रज्ञानातून कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचणार असून एक प्रकारे हरित ऊर्जेचा वापर होणार आहे.