गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी आवश्यक मंडप उभारणीस महापालिकेतर्फे परवानगी दिली जाते
गणेश विसर्जनासाठी महापालिका सज्ज

महाराष्ट्रात विशेषत: मुंबईतील गणेशोत्सवाला एक सांरकृतिक वारसा लाभला आहे. या कालावधीत संपूर्ण मुंबईत उत्सवाचे व आनंदाचे वातावरण असते. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे केले जाते. या आनंदमयी उत्सवापूर्वी, उत्सवादरम्यान व उत्सव संपल्यानंतरसुद्धा महापालिकेतर्फे विविध सोयीसुविधा पुरविल्या जातात. यासाठी दोन ते तीन महिने अगोदरपासूनच तयारी सुरू होते. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेश उत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार महासंघ यांजसमवेत बैठका घेण्यात येऊन, त्यांच्या सूचना विचारात घेण्यात येतात. या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी महापालिकेतील विविध पदाधिकारी तसेच एम.एम.आर.डी.ए., नेव्ही, पोलीस आदी विविध प्राधिकरणांचेदेखील सहकार्य लाभत असते. गणेशोत्सवाच्या काळात महापालिकेतर्फे मुख्यत: मंडप उभारणीसाठी परवानगी देणे, मुंबईतील रस्त्यांची दुरुस्ती, डागडूजी, तात्पुरते रस्ते बांधणे, वृक्षछाटणी, निर्माण होणाऱ्या कचऱ्‍याची विल्हेवाट, सार्वजनिक आरोग्याची काळजी, वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण आदी कामकाज केले जाते.

गणेशोत्सवापूर्वी मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी आवश्यक मंडप उभारणीस महापालिकेतर्फे परवानगी दिली जाते. तसेच, गणेशोत्सव मंडळांनादेखील मंडप उभारणीसाठी महापालिकेतर्फे परवानगी दिली जाते. सन २०१८ पासून परवानगीसाठी संगणकीय प्रणाली सुरू केली आहे. ज्यामुळे मंडप परवानगीसाठी मंडळांना धावपळ करावी लागत नाही. तसेच परवानगी जलद गतीने प्राप्त होऊ शकते. सदर प्रणाली यावर्षी दि. ०४.०७.२०२२ रोजी सुरू करण्यात येऊन, दि. २६.०८.२०२२ रोजी बंद करण्यात आली असून, याद्वारे यावर्षी २२६६ मंडपांना परवानगी देण्यात आलेली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे श्रीगणेश गौरव स्पर्धेचे प्रतिवर्षी आयोजन करण्यात येते व विजेत्यांना पुरस्कार देण्यात येतात. सदर स्पर्धेचे आयोजन यावर्षीदेखील करण्यात आले असून, त्याला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

घरगुती/सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक तसेच कृत्रिम तलावांची सुविधा जनतेस उपलब्ध करून दिली जाते. विसर्जन स्थळांवर स्टील प्लेट्स, नियंत्रण कक्ष, जीवरक्षक, मोटारबोट, प्रथमोपचार केंद्र, रुग्णवाहिका, स्वागत कक्ष, निर्माल्य कलश, निर्माल्य वाहन, डम्पर, फ्लड लाईट, सर्च लाईट, विद्युत व्यवस्था आवश्यकतेनुसार निरीक्षण मनोरे, जर्मन तराफे इत्यादी सुविधा पुरविल्या जातात. यासाठी आवश्यक अर्थसंकल्पीय तरतूद विभागवार केली जाते. विसर्जनासाठी ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळे असून, १६२ कृत्रिम विसर्जनस्थळे निर्माण केली आहेत. या ठिकाणी ४६० स्टील प्लेट, १८८ नियंत्रण कक्ष, ७८६ जीवरक्षक,

४५ मोटारबोट, ३९ जर्मन तराफा, २११ स्वागतकक्ष, ३०६९ फ्लड लाईट, ७१ सर्च लाईट,

१८८ प्रथमोपचार केंद्र, ३५७ निर्माल्य कलश,

१३४ तात्पुरती शौचालये, ४८ निरीक्षण मनोरे,

८३ रुग्णवाहिका तसेच संरक्षण कठडे व विद्युत व्यवस्थेसह महापालिका विसर्जनासाठी सज्ज आहे.

विसर्जनाचे वेळी एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी गतवर्षी ‘डी’ विभागातर्फे अॅप विकसित करण्यात आले होते. ज्यायोगे, विसर्जनासाठीची वेळ निशि्‍चत करता येऊ शकते. सदर सुविधा यावर्षी सर्व विभागीय कार्यालयांनी उपलब्ध करून दिली आहे.

दादर, मालाड, पवई इ. ठिकाणी प्रामुख्याने गिरगाव चौपाटी येथे मोठमोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन पार पडते. येथे विदेशी पाहुणे, मान्यवर इत्यादींसाठी विशेष कक्षाची निर्मिती केली जाते. गणेशोत्सव सुरळीत पार पडावा, आगमन/ विसर्जनादरम्यान दुर्घटना घडू नये, यासाठी महापालिका / पोलीस आदींच्या माध्यमातून विशेष दक्षता घेतली जाते. प्रतिवर्षी विविध प्राधिकरणांच्या सहकार्याने गणेशोत्सव सुरळीत पार पडतो.

बृहन्मुंबई महानगरपालिका गणेशोत्सव-२०२२

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात आलेल्या सुविधा व करण्यात आलेली तयारी

मूर्तिकारांना मंडप परवानग्या देण्यात आल्या

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानग्या

यावर्षी विशेष बाब म्हणून मंडप परवानगी शुल्क माफ करण्यात आले

महानगरपालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळे असून १५२ कृत्रिम विसर्जनस्थळे आहेत

श्रीगणेशमूर्ती विसर्जन ऑनलाइन नोंदणी सुविधा ही https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर

आपल्या निकटच्या परिसरातील विसर्जनस्थळांची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी, याकरिता व्हॉट्सअॅप चॅटबोट क्रमांक ८९९९-२२-८९९९ याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे

प्रमुख विसर्जनस्थळी ७८६ जीवरक्षक तैनात

नैसर्गिक विसर्जनस्थळी आवश्यक तेथे ४५ मोटार बोट व ३९ जर्मन तराफ्यांची व्यवस्था

सुसमन्वय साधण्यासाठी प्रमुख विसर्जनस्थळी २११ स्वागतकक्ष अधिक चांगल्या प्रकाश व्यवस्थेसाठी ३ हजार ०६९ फ्लड लाईट व ७१ सर्च लाईट व्यवस्था

महत्त्वाच्या विसर्जनस्थळी वैद्यकीय सामग्रीसह सुसज्ज असणारे १८८ प्रथमोपचार केंद्र व ८३ रुग्णवाहिका

निर्माल्यापासून खत बनविण्यासाठी निर्माल्य गोळा करण्यास उपयोगी ठरणारे ३५७ निर्माल्य कलश व २८७ निर्माल्य वाहने

अधिक चांगल्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ४८ निरीक्षण मनोरे व आवश्यक तेथे संरक्षक कठडे

महत्त्वाच्या विसर्जनस्थळी १३४ तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था

चौपाट्यांवर श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांची चाके वाळूमध्ये रुतू नयेत, यासाठी ४६० पोलादी प्लेट (स्टील प्लेट)ची व्यवस्था

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांद्वारे विविध लोकहित विषयक जनजागृतीपर माहिती नागरिकांपर्यंत पोहाेचण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवास चालना मिळावी, या प्रमुख उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी गणेश गौरव स्पर्धेचे आयोजन

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in