भाईंंदर : भाईंदरमधून डंपर चोरून तो परभणीत नेऊन विकणाऱ्या चोरट्यास मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ ने अटक केली असून डंपर देखील हस्तगत केला आहे. भाईंदर पश्चिमेस भोला नगर जवळ सार्वजनिक ठिकाणी उभा केलेला डंपर १३ मार्च रोजी चोरीला गेल्याचे आढळून आल्यावर चालक सुरेश मंजुरकर यांच्या फिर्यादीवरून भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व पथक करत होते.
सदर डंपर चोरीला गेल्यानंतर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी पोलिसांनी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेजचा तपास करत पोलीस थेट परभणीपर्यंत पोहचले. परभणी येथील देवाशिष पेट्रोल पंपपर्यंत डंपर दिसून आला. पोलीस पथकाने त्या भागातील वाहन चोरीचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातील वैजनाथ लक्ष्मण लांडगे (६७) रा. साईबाचा नगर, परभणी यांचा संशय आल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
वैजनाथ लांडगे यांचा शोध घेतला असता त्याचा मोटार अपघात होऊन तो गंभीर जखमी झाल्याने परभणी येथे रुग्णालयात दाखल केले आहे. त्याने सदरचा डंपर हा चंद्रकांत गणपतराव जाधव (रा. जालना) यांना विक्री केल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडून तो हस्तगत केला आहे.