हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल, अतिवृष्टीचा इशारा अन् शाळेला सुट्टी वाया गेली

हवामान खात्याने दिलेल्या रेड आणि ऑरेंट अलर्टमुळे मुंबई, ठाणे आणि रायगडातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टीचे आदेश देण्यात आले होते; मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरत सकाळी लख्ख उन पडल्याने सर्वांचीच निराशा झाली;
हवामान खात्याचा अंदाज ठरला फोल, अतिवृष्टीचा इशारा अन् शाळेला सुट्टी वाया गेली
प्रातिनिधिक फोटो
Published on

ठाणे : हवामान खात्याने दिलेल्या रेड आणि ऑरेंट अलर्टमुळे मुंबई, ठाणे आणि रायगडातील शाळांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टीचे आदेश देण्यात आले होते; मात्र नेहमीप्रमाणे हवामान खात्याचा अंदाज फोल ठरत सकाळी लख्ख उन पडल्याने सर्वांचीच निराशा झाली; मात्र चाकरमान्यांनी सुटकेचा श्वास घेत आपली कार्यालये गाठली. दरम्यान, मंगळवारी ठाण्यात दिवसभर अवघ्या ८.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली.

हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिल्याने त्या त्या जिल्हा प्रशासनाने आदल्या रात्रीच शाळा-महाविद्यालयांना सुट्टीचे आदेश दिले. त्यानुसार शाळांनाही विद्यार्थ्यांना सुट्टी दिली; मात्र दिवस उजाडताच आकाश काहीसे ढगाळ, तर काहीसे निरभ्र होत दुपारपर्यंत पावसाने चांगलीच उघडीप घेतली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, एनडीआरएफ, टीडीआरएफच्या टीम आपत्तीचा सामना करण्यासाठी तैनात ठेवल्या होत्या; मात्र अतिवृष्टीचा इशारा फोल ठरून दिवसभर पावसाने उघडीप घेतली, तर दुपारनंतर पावसाची संथ रिपरिप सुरू झाली. उकाडयाने हैराण झालेल्या ठाणेकरांना सुखद गारवा मिळाला. दरम्यान दुसऱ्या दिवशी हवामान खाते, आपत्ती विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा पावसाचा अंदाज न आल्याने चाकरमान्यांसह सर्वच जण आपल्या दैनंदिन कामाला लागले.

logo
marathi.freepressjournal.in