मेट्रो-५ विस्ताराला हिरवा कंदील; भोईरवाडी-उल्हासनगर टप्प्यासाठी MMRDA कडून निविदा प्रक्रिया सुरू

उल्हासनगरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई मेट्रो-५च्या दुसऱ्या टप्प्यातील भोईरवाडी ते उल्हासनगर या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
मेट्रो-५ विस्ताराला हिरवा कंदील; भोईरवाडी-उल्हासनगर टप्प्यासाठी MMRDA कडून निविदा प्रक्रिया सुरू
मेट्रो-५ विस्ताराला हिरवा कंदील; भोईरवाडी-उल्हासनगर टप्प्यासाठी MMRDA कडून निविदा प्रक्रिया सुरूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता प्रत्यक्ष गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई मेट्रो-५च्या दुसऱ्या टप्प्यातील भोईरवाडी ते उल्हासनगर या महत्त्वाकांक्षी मार्गाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे उल्हासनगरच्या विकासाला नवे पंख मिळणार असून, आधुनिक, जलद आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे.

उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलानी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने एमएमआरडीएने या टप्प्यातील विविध कामांसाठी अधिकृत निविदा जाहीर केल्या आहेत. या निविदांमध्ये मेट्रो व्हायाडक्ट, उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके, आर्किटेक्चरल फिनिशिंग, प्री-इंजिनिअर्ड स्टील रूफ स्ट्रक्चर तसेच अन्य महत्त्वाच्या बांधकामांचा समावेश आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना लवकरच वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या मेट्रो विस्तारामुळे भोईरवाडी, उल्हासनगर आणि परिसरातील लाखो नागरिकांना जलद, सुरक्षित व आधुनिक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच शहरातील वाढती वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असून, प्रवाशांचा वेळ आणि प्रवास खर्चही वाचणार आहे.

आमदार कुमार आयलानी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून हा प्रकल्प लवकर सुरू करण्याची मागणी केली होती. त्या प्रयत्नांचे फलित म्हणून आता निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रो-५चा हा विस्तार उल्हासनगरच्या आर्थिक, व्यापारी आणि नागरी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, शहराला मुंबई महानगर क्षेत्रातील आधुनिक मेट्रो नेटवर्कशी जोडणारा हा महत्त्वाचा दुवा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रकल्पाची सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण होऊन मेट्रो सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी शासन आणि एमएमआरडीए स्तरावर पुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाईल.

कुमार आयलानी, आमदार

logo
marathi.freepressjournal.in