
भाईंंदर : मीरा-भाईंदर परिसरातील डोंगरी येथे प्रस्तावित मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या विरोधात रविवारी सुमारे ६ हजारांहून अधिक नागरिकांनी मानवी साखळी आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त केला. या कारशेड प्रकल्पामुळे नैसर्गिक ऑक्सिजनचा स्रोत, जैवविविधता, पर्यावरण, हजारो पक्षी व प्राण्यांचा निवारा तसेच स्थानिकांची शेती व बागायती नष्ट होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी कारशेड लादल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि मेट्रो ७ए साठी सुभाषचंद्र बोस मेट्रो स्थानकाजवळ मोकळी जागा असतानाही सुमारे ७-८ किमी दूर असलेल्या डोंगरी डोंगरावर कारशेड उभारण्याचा निर्णय एमएमआरडीए आणि शासनाने घेतला आहे. या डोंगरावरील १२,४०० झाडांची कत्तल केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असूनही प्रत्यक्षात मात्र ही संख्या १५ ते १८ हजार असल्याचा स्थानिकांचा दावा आहे. झाडांचे वय आणि संख्या कमी दाखवून वृक्षतोड सुरू केल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे.
या डोंगरात असलेली नैसर्गिक झरे, धबधबे, औषधी वनस्पती, विविध पक्षी व प्राणी प्रजाती, तसेच ग्रामस्थांनी उभारलेली धरणे व शेती हे देखील नष्ट केली जाणार आहे. हा संपूर्ण परिसर मीरा-भाईंदर शहरासाठी महत्त्वाचा ऑक्सिजन झोन असून, पर्यावरणाचे संतुलन राखणारा भाग आहे. मात्र डोंगरावर स्फोटकांच्या सहाय्याने खोदकाम आणि हजारो झाडांची कत्तल करून कारशेड उभारल्यास स्थानिक भूमिपुत्र, शेतकरी व पर्यावरण यावर विनाशकारी परिणाम होणार आहे.
या परिसरात यापूर्वीच महापालिकेने धावगी डोंगरावर बेकायदेशीर कचरा डम्पिंग केल्याने मोठ्या प्रमाणावर प्रदूषण, दुर्गंधी व शेतीची हानी झाली आहे. कारशेड प्रकल्पामुळे उरलेले निसर्गसंपन्न डोंगर नष्ट झाल्यास, नागरिकांचे जीवन अधिक असह्य होईल, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
१५ ते २० हेक्टर जागा देखील कारशेडसाठी पुष्कळ असताना डोंगरी येथे तब्बल ७० हेक्टर जागा कारशेडच्या आड घेतली आहे. विधानभवनात २०२२ च्या अधिवेशनात नगरविकास मंत्री यांनी लिहून दिले होते की, डोंगरी परिसर तांत्रिकदृष्ट्या कारशेडसाठी अयोग्य आहे. तरीही सरकारने ७० हेक्टर निसर्गसंपन्न डोंगराळ परिसर कारशेडसाठी निवडल्याने जाणीवपूर्वक ही जागा निवडल्याबाबात प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
२१ ठिकाणी एकत्रित आंदोलन
डोंगरी कारशेडविरोधातील लढा आता फक्त भाईंदरपुरता मर्यादित न राहता मुंबई व उपनगरांतील २१ ठिकाणी आंदोलन करण्यात आले. त्यामुळे या विषयावर जनआंदोलन उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंदोलनकर्त्यांनी शासनाकडे मागणी केली की, उपलब्ध मोकळ्या जागांमध्येच कारशेड हलवावे, अन्यथा स्थानिकांवर कारवाई लादल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल.
शांततापूर्ण आंदोलन
रविवार, ६ जुलै रोजी सकाळी ९.१५ ते ११.१५ या वेळेत डोंगरी दत्त मंदिर ते चौक गावपर्यंत मानवी साखळी तयार करण्यात आली. नागरिक, मच्छिमार, शेतकरी, विविध संस्था, पक्षांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, महिलांनी काळे झेंडे, निषेध फलक घेऊन शांततापूर्ण आंदोलनात भाग घेतला. 'झाडे वाचवा, डोंगर वाचवा, कारशेड थांबवा' असे संदेश देणारे फलक आणि प्रतीकात्मक कृतीही (जसे काचेच्या बरणीत झाड ठेवून ऑक्सिजन मिळवण्याचा संदेश) लोकांचे लक्ष वेधत होते. शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या मातोश्री ज्योती राणे, तसेच विविध धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, पत्रकारांनी आंदोलनात भाग घेतला.