
भाईंंदर : मीरारोड व भाईंदर पश्चिम भागात मेट्रो कारशेडसाठी मोकळ्या मुबलक जागा असताना डोंगरीच्या डोंगरावरील १२ हजार ४०० झाडे तोडण्याच्या निर्णयाविरुद्ध २१ हजार पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्या आणि विविध संस्था, संघटना, नागरिकांच्या तक्रारींची निवेदने महापालिका, शासन आदींना दिली असतानाच मंजुरी नसलेली झाडे तोडणे व झाडांचे वय कमी दाखवून वृक्ष घोटाळा केल्याच्या तक्रारी नागरिकांनी चालवल्या आहेत. इतकेच नव्हे, तर अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करून दिलेली परवानगी रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
भाईंदरच्या सुभाषचंद्र बोस मैदान मेट्रो स्थानकजवळ मीरा इस्टेट, राधा स्वामी सत्संगसह अनेक बिल्डर आदींच्या भरपूर मोकळ्या जागा आहेत. शिवाय राई, मुर्धा-मोरवा गावाच्या मागे मोकळ्या जागा असून या बहुतांश जागा बिल्डरांनी घेतल्या आहेत. या मोकळ्या व ओसाड जागांवर कारशेड न करता थेट शहराच्या ऑक्सिजनचे मुख्य स्रोत असलेल्या डोंगरीच्या डोंगरावरील १२ हजार ४०० पेक्षा झाडे तोडून कारशेड बनवण्यास ग्रामस्थांसह शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्था, संघटना आदींचा विरोध आहे. आम्हाला ऑक्सिजन, शुद्ध व थंड हवा आणि ग्लोबल वॉर्मिंग नियंत्रणात ठेवून पाऊस देणारी तसेच प्रदूषण कमी करणारी झाडे हवीत तर झाडे तोडून कारशेड नको, अशी मागणी करत २१ हजारपेक्षा जास्त नागरिकांनी सह्या केल्या आहेत.
२१ पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्या आणि असंख्य निवेदनेही सोमवारी महापालिका आयुक्त यांना तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, परिवहन मंत्री आदींना देण्यात आली. उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार एमएमआरडीएमध्ये अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व पहिल्या टप्प्यातील १४०६ झाडे काढण्याच्या निर्णयास स्थगितीबाबत उपायुक्त कल्पिता पिंपळे यांना सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी देखील परवानगी नसलेली आणि वय कमी दाखवून झाडे तोडली जाणे गंभीर असून आपण देखील इतक्या मोठ्या वृक्षतोडीच्या बाजूने नसल्याचे सांगत आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्रशासन व ठेकेदार यांच्या संगनमताने पालिकेने परवानगी न दिलेली झाडे देखील मोठ्या संख्येने तोडली आहेत. प्रत्यक्ष जागेवर झाडे मोठी व जुनी अशी १५ वर्षांपेक्षा जास्त वयाची असताना देखील हा वृक्ष घोटाळा दुर्लक्षित करून बेकायदा झाडे कत्तल केल्याने नागरिकांनी गुन्हा दाखल करण्याची व झाडे तोडण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी चालवली आहे.
जनआंदोलनाचा इशारा
ठेकेदाराने झाडे तोडण्यास घेतल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. रविवारी डोंगरी-तारोडीसह परिसरातील ग्रामस्थांनी निषेध फेरी काढली. यावेळी बोस मैदानपासून मेट्रो मार्गिकेच्या कामाचे दूर तर भूसंपादनपासून अनेक प्रक्रिया, परवानग्या, कांदळवन आणि सीआरझेड परवानगीदेखील आली नसताना झाडे तोडण्याची घाई कशाला? असा संतप्त सवाल नागरिकांनी केला. कारशेड दुसरीकडे न हलवल्यास जनआंदोलन मोठे उभारू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.