प्रभागाचा ‘विकास’ होत नसल्याने म्हात्रे यांचा भाजप सदस्यपदाचा राजीनामा

या दोन्ही प्रभागात एकही रस्ता कॉंक्रीटीकरण झाला नाही. तसेच अनियमित पाणी पुरवठाबाबत वारंवर पत्रव्यवहार करूनही संबधित विभागाने लक्ष दिले नाही.
प्रभागाचा ‘विकास’ होत नसल्याने म्हात्रे यांचा भाजप सदस्यपदाचा राजीनामा

डोंबिवली : केंद्रात भाजप आणि राज्यात युती सत्ता असतानाही भाजपच्या माजी नगरसेवकाच्या प्रभागात विकासकामे होत नसल्याने वैतागून विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. म्हात्रे यांनी राजीनाम्याचे पत्र डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांच्याकडे दिले आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत स्थायी समिती सभापतीपद आणि अनेक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागातील नागरिकांचे काम व विकासकामे करणारे विकास म्हात्रे यांनी दिलेल्या राजीनामामुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे. विकास म्हात्रे यांनी २०१५ नंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. २०१५ साली पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत गरीबाचा वाडा येथून तर त्यांच्या पत्नी कविता म्हात्रे या राजू नगर प्रभागातून निवडून आले. राजू नगर व गरीबाचा वाडा या प्रभागाचा अपुऱ्या निधीमुळे समस्या सुटल्या नाहीत. म्हात्रे यांनी अनेक वेळेला प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार केले होते; मात्र प्रशासनाने पत्राकडे लक्ष दिले नाही. प्रभागातील अनेक रस्त्यांची कामे अपुरी असल्याने व पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडल्याने नागरिक पुरते वैतागले आहेत.

लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कमी पडत आहोत का?

या दोन्ही प्रभागात एकही रस्ता कॉंक्रीटीकरण झाला नाही. तसेच अनियमित पाणी पुरवठाबाबत वारंवर पत्रव्यवहार करूनही संबधित विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कमी पडत आहोत का? असा प्रश्नही म्हात्रे यांनी राजीनामा पत्रात उपस्थित केला आहे. त्यामुळे माजी नगरसेवक विकास म्हात्रे व कविता म्हात्रे यांनी भाजप सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांना विचारले असता ते म्हणाले, "म्हात्रे यांनी जरी राजीनामा पत्र माझ्याकडे दिले असले, तरी तो आम्ही स्वीकारला नाही. त्यांचे जे म्हणणे आहे त्याबद्दल वरिष्ठ नेतेमंडळींशी बोलणार आहे."

logo
marathi.freepressjournal.in