नितीन बोंबाडे/पालघर
सोमवारी आलेला होळीचा सण पारंपरिक पद्धतीने जल्लोषात साजरा करण्यासाठी ठिकठिकाणी रोजगारासाठी स्थलांतरित झालेली आदिवासी कुटुंब आपल्या गावी तलासरी, डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार तालुक्यात मोठ्या संख्येने परतु लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघर तालुक्यातील जव्हार फाटा, मस्तन नाका, डहाणू तालुक्यातील चारोटी, धूंदलवाडी या भागात तर रेल्वे स्थानक, बस स्थानक, रिक्षा थांबे गजबजून गेले आहेत. सलग पाच दिवस उदरनिर्वाहाच्या कामांना सुटी देऊन आदिवासी बांधव होळीच्या रंगात न्हाऊन निघतात. यासाठी रोजगारासाठी बाहेरगावी गेलेले आदिवासी बांधव सध्या होळीच्या सणासाठी परतीच्या मार्गावर दिसून येत आहेत.
शाळेला तीन दिवस सुट्टी असल्याने आश्रमशाळा, शाळा, वसतिगृहातील पालक आपल्या मुलांना होळीसाठी घरी नेत असल्याचे चित्र आहे. पालघर जिल्ह्यात तलासरी, डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार तालुक्यात होळी सण साजरा करण्यासाठी कामावर गेलेल्या मुंबई, सुरत, संजाण, ठाणे, भिवंडी, वसई शहरात रोजगारासाठी मोठ्या संख्येने स्थलांतरित झालेले नागरिक पहावयास मिळत आहे. अन्य ठिकाणी कामावर गेलेल्या मजूर बांधव होळी सणासाठी गावाकडे परतु लागले आहेत. आदिवासी बांधव होळीचा सण आनंदात साजरा करतात.
घाटांचा मेळ असणाऱ्या मेळघाटात आदिवासींमध्ये कोरकू, गोंड, राठीया या प्रमुख जाती अधिक प्रमाणात आहेत. आदिवासींच्या सर्वच जाती दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होळी साजरी करण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे मेळघाटात होळी सणाला अधिक महत्त्व प्राप्त असते.
होळीच्या निमित्ताने एकोप्याचे दर्शन
आदिवासी संस्कृतीमध्ये होळी उत्सवाला मोठे महत्त्व आहे. त्यासाठी कामाच्या ठिकाणाहून हिशोब घेऊन, अंगावर खर्ची घेऊन अत्यंत आनंदात हा सण साजरा करतात. होळीच्या पूर्वसंध्येला गावाजवळचे भेंडीचे, आंब्याचे, भेंडीचे झाड किंवा माडाचे झाड, पोकळीचे झाड निवडले जाते. होळीसाठी कुठले झाड वापरायचे याचीही प्रत्येक गावाची परंपरा आहे. निवडलेल्या झाडाची विधिवत पूजा करून ते तोडून वाजतगाजत मिरवणुकीने आणले जाते.
जुन्या होळीच्या खड्ड्याच्या ठिकाणी हे झाड उभारले जाते. गावातून घराघरातून सुकी लाकडे गोळा केली जातात. आंब्याच्या पानांचे तोरण आणि नारळ बांधला जातो. त्याभोवती सुकलेला पालापाचोळा, काटक्या, झावळ्या, पेंढा रचून होळी तयार केली जाते. रात्रभर या होळीभोवती पारंपरिक तारपा नृत्य, सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्यानंतर होळीचे पूजन करून नैवेद्य दाखवला जातो आणि गाऱ्हाणे घातले जाते. गावकरी होळीला नारळ अर्पण करतात आणि नवस फेडतात. रात्रभर नाचून, गाऊन जागरण करतात. एकमेकांना मनसोक्त शिव्याही देतात. सोंगे घेऊन फगवा, पोस्त जमा करतात. त्यातून जमा झालेल्या पैशातून एकत्र जमून मेजवानी करतात. त्यासाठी लहान मुले, तरुण मुलांच्या टोळ्या, युवकांच्या टोळ्या गावागावातून रंगाची उधळण करत फिरतात. एकमेकांविषयी असलेला वैरभाव संपुष्टात आणून एकोपा निर्माण करतात. जवळपास आठवडाभर होळी उत्सवाची धुंद गावागावातून पाहायला मिळते.