

कल्याण : घरात सुख-शांती नांदेल असे आमिष दाखवून पूजा करण्याच्या बहाण्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी ७८ वर्षीय भोंदूबाबा शाहीद शेख याला बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगर येथे राहणाऱ्या शाहीद शेख याने कल्याणमधील पीडित मुलीच्या आईशी ओळख वाढवली होती. तुमच्या घरात शांतता लाभेल, असे सांगून पूजा करण्यासाठी तो २ मे रोजी त्यांच्या घरी आला. घरात थातूरमातूर पूजा मांडल्यानंतर, त्याने १५ वर्षीय मुलीला तोकड्या कपड्यांत समोर बसण्यास भाग पाडले. यादरम्यान त्याने मुलीला अयोग्य स्पर्श करून तिचा विनयभंग केला.
सुरुवातीला घाबरलेल्या पीडितेने कोणालाही काही सांगितले नाही. याच गोष्टीचा फायदा घेत शाहीद शेख ६ मे रोजी पुन्हा त्या मुलीच्या घरी आला आणि त्याने पुन्हा लगट करण्याचा प्रयत्न केला. भोंदूबाबा निघून गेल्यानंतर घाबरलेल्या मुलीने आपल्या आईला सर्व आपबिती सांगितली. मुलीच्या आईने तत्काळ खडकपाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी शाहीद शेखविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे. खडकपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.