भाईंंदर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आणि विशेष निधीतून मीरारोड येथे साकारण्यात आलेल्या “स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क”चे स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
मीरारोड (पूर्व) येथील आरक्षण क्र. २५६ या जागेवर हे ट्रॅफिक पार्क बांधण्यात आले असून, स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना आदरांजली म्हणून या उद्यानाला त्यांचे नाव देण्यात आले. हा प्रस्ताव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महानगरपालिकेकडे मांडला होता, ज्यास पालिकेने मंजुरी दिली.
स्व. गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी मीरा-भाईंदरच्या विकासात मोलाची भूमिका बजावली होती. समाजकारण, लोकहिताचे कार्य आणि सार्वजनिक विकासकामांमधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन हे नामकरण करण्यात आले आहे. “त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भविष्यात आणखी मोठ्या वास्तूंनाही त्यांचे नाव दिले जाईल,” असे प्रताप सरनाईक यांनी या प्रसंगी सांगितले.
या प्रसंगी स्व. गिल्बर्ट मेंडोन्सा यांच्या मुली माजी महापौर कॅटलीन परेरा व लॉड्रेटा डिसिल्व्हा, जावई अँथोनी परेरा व स्टीफन डिसिल्व्हा, नातू पर्श परेरा, टॉल्चर मेंडोन्सा, क्रेईन्स रॉड्रिक्स, तसेच शिवसेनेचे राजू भोईर, धनेश पाटील, तारा घरत, विक्रमप्रताप सिंह, निशा नार्वेकर, पूजा आमगावकर, सचिन मांजरेकर, राजेंद्र मित्तल, सुनील केसरी, महेश शिंदे, ब्रिजेश सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरक्षेबाबत सकारात्मक संस्कार रुजतील
वाहतूक शिस्त ही सुरक्षित समाजाची पायरी असल्याचे प्रतिपादन करताना सरनाईक म्हणाले, लहान मुलांना बालपणापासूनच वाहतूक नियमांचे शिक्षण देणे गरजेचे आहे. या ट्रॅफिक पार्कद्वारे हे कार्य प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आणि नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त, जनजागृती आणि सुरक्षेबाबत सकारात्मक संस्कार रुजतील.
पार्कची वैशिष्ट्ये
“स्व. गिल्बर्ट जॉन मेंडोन्सा ट्राफिक पार्क”चे एकूण क्षेत्रफळ २,३६५ चौरस मीटर आहे. या उद्यानाचा उद्देश नागरिकांमध्ये, विशेषतः लहान मुलांमध्ये, वाहतूक नियमांचे शिक्षण आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती निर्माण करणे हा आहे. पार्कमध्ये लहान मुलांसाठी खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले एरिया, बसण्यासाठी सुसज्ज जागा, तसेच ट्रॅफिकच्या सांकेतिक खुणा लावण्यात आल्या आहेत. याशिवाय मुलांसाठी कमांडो वॉल, क्लायमिंग वॉल, स्विंग ब्रिज आणि विविध टनेल्स उभारण्यात आल्या आहेत. या उपक्रमामुळे मीरा-भाईंदर शहरात वाहतूक शिस्त, जनजागृती आणि सुरक्षिततेबाबतचा नवा अध्याय सुरू होणार आहे.