काशिमीरात चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले, घरातच डांबले, POCSO गुन्हा दाखल करुन अटक

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एका १० वर्षीय चिमुरडीवर बाजूलाच राहणाऱ्या नशेखोर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
काशिमीरात चिमुरडीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; शेजाऱ्यांनी आरोपीला पकडले, घरातच डांबले, POCSO गुन्हा दाखल करुन अटक
Published on

भाईंंदर : काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत गुरुवारी २२ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एका १० वर्षीय चिमुरडीवर बाजूलाच राहणाऱ्या आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला घरातच डांबून ठेवले. पोलीस आल्यानंतर त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा पोलिसांनी विनयभंगसह पोस्कोचा गुन्हा दाखल केला.

मागेच काही दिवसांपूर्वी भाईंदरमध्ये रात्री १२ च्या वेळेस तरुणीवर ब्लेडने वार करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी त्या नराधम आरोपीला अटक केली होती. मात्र यावरून महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत, एक १० वर्षीय पीडित ही घरी एकटी असताना दुपारच्या वेळेस शेजारच्या परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने त्या पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तिचे आई वडिल कामावर गेले होते. त्यावेळी पीडितेने आरडाओरड केल्याने शेजारच्या लोकांनी पुढाकार घेत पीडित मुलीला घराबाहेर काढून आरोपीला घरातच कोंडून ठेवले होते. प्रसाद कनोजिया (२५) असे त्याचे नाव आहे. तो याच परिसरात राहतो आणि फूड डिलिव्हरीचे काम करतो. 

याप्रकरणी अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगेश बुऱ्हाडे हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in