Mira Bhayandar : पॉड टॅक्सीला दिवाळीचा मुहूर्त; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मीरा-भाईंदर शहराची वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि नागरिकांना एक अत्याधुनिक, पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी ऐतिहासिक 'पॉड टॅक्सी' (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या दिवाळीत करण्याचा मानस आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
Mira Bhayandar : पॉड टॅक्सीला दिवाळीचा मुहूर्त; मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
Published on

भाईंदर: मीरा-भाईंदर शहराची वाहतूककोंडी कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आणि नागरिकांना एक अत्याधुनिक, पर्यावरणपूरक वाहतुकीचा पर्याय देण्यासाठी ऐतिहासिक 'पॉड टॅक्सी' (उन्नत कार) प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या दिवाळीत करण्याचा मानस आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शहरातील नागरिकांच्या सेवेत दाखल होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर महानगरपालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध विकासकामांच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. मंत्री सरनाईक यांनी माहिती दिली की, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी १८०० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांना, तसेच रस्ते दुरुस्तीसाठी ९०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्याअंतर्गत सुरू असलेल्या आणि नियोजित अशा एकूण २६ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यातील बहुतेक विकासकामे सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होतील आणि त्याचा लाभ शहरातील नागरिकांना निश्चितपणे मिळेल, असे सरनाईक म्हणाले.

प्रकल्पाची कार्यवाही वेगाने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून, महापालिकेने कारशेडसाठी आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी, असे आदेशही देण्यात आले आहेत. प्रकल्पाच्या सुरुवातीच्या टप्प्यात जेपी इन्फ्रा परिसर, प्रभाग क्रमांक १२, १३ आणि १८ येथील रुंद रस्त्यांवरून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

पॉड टॅक्सीच्या माध्यमातून वाहतुकीला नवी दिशा

या बैठकीचे सर्वात मोठे आकर्षण ठरला तो म्हणजे मीरा-भाईंदर शहरासाठी प्रस्तावित असलेला अत्याधुनिक पॉड टॅक्सी प्रकल्प. गुजरातमधील बडोदा येथे सुरू होणाऱ्या प्रकल्पानंतर, महाराष्ट्रात अशा प्रकारचा हा दुसरा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे.

मीरा-भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. येथील नागरिकांसाठी जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास उपलब्ध करून देणे हा आमचा प्रमुख उद्देश आहे. महापालिका किंवा राज्य शासनाचा एकही रुपया खर्च न होता, पॉड टॅक्सीसारखा अत्याधुनिक प्रकल्प मीरा-भाईंदरमध्ये साकारत आहे, याचा मला आणि संपूर्ण शहराला अभिमान वाटतो.

प्रताप सरनाईक

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  • या प्रकल्पासाठी अंदाजे एकूण खर्च १,००० कोटी रुपये.

  • हा प्रकल्प 'बांधा, वापरा, हस्तांतरित करा' तत्त्वावर राबवला जाणार

  • हा प्रकल्प पूर्णपणे खासगी गुंतवणुकीतून साकारला जाणार

  • मेट्रो स्थानकांना जोडणारी एकूण १६ पॉड टॅक्सी स्थानके

  • प्रवाशांना केवळ २ मिनिटे प्रतीक्षा करावी लागेल.

  • १ ते २ किलोमीटरच्या प्रवासासाठी ३० रुपये तिकीट दर

  • हा दर पुढील ३० वर्षांसाठी स्थिर राहणार

  • हा प्रकल्प अत्याधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाने सुसज्ज

  • हा प्रकल्प किमान १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांवरच उभारला जाणार

logo
marathi.freepressjournal.in