मीरा-भाईंदर शहराला पाणी कपातीचे ग्रहण

मीरा-भाईंदर शहराला पाणी कपातीचे ग्रहण लागलेले आहे. हे पाणी कपातीचे ग्रहण कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मीरा-भाईंदर शहराला पाणी कपातीचे ग्रहण
Published on

भाईदर मीरा-भाईंदर शहरात विविध कामांसाठी वारंवार पाणीपुरवठा काही तासासाठी बंद करण्यात येतो. यावर्षी जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडूनही वारंवार विविध कामांसाठी पाणी कपात करण्यात येते. मीरा-भाईंदर शहराला पाणी कपातीचे ग्रहण लागलेले आहे. हे पाणी कपातीचे ग्रहण कधी संपणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मीरा- भाईंदर शहराला करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येत असल्यामुळे शहरातील रहिवाशांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन सणासुदीमध्ये पाणीटंचाई होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मीरा-भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा करण्यात येतो. या दोन्ही प्राधिकरणाकडून जवळपास २१० एमएलडी पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु दररोज जवळपास १९० एमएलडी पाणीपुरवठा शहरास करण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या वाढत असताना हा पाणीपुरवठा कमी आहे. त्यात दर आठवड्याला काहीना काही कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या पाणीटंचाईतून नागरिकांची सुटका करण्यासाठी सूर्या प्रकल्पातून मीरा-भाईंदर शहराला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा विभागाचे आवाहन

बारावी व उल्हास नदीपात्राच्या परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात डेब्रिज व कचरा जमा होत आहे. त्यामुळे बारावी पंप हाऊस येथील पंपाचे स्ट्रेनर्स वारंवार चोकअप होत आहेत. त्यामुळे पंप पूर्ण क्षमतेने पाणी खेचत नसल्याने कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे बारवी वॉटर वर्क्स येथे पंप स्ट्रेनर्स आणि ग्रिल साफ करण्यासाठी शुक्रवारी दुपारी १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत असे ५ तासांसाठी एमआयडीसी प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एमआयडीसी प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत शहरास पाणीपुरवठा कमी दाबाने व उशिराने होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करून महापालिकेस सहकार्य करावे, असे पाणीपुरवठा विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठ्याचा शुभमुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे २०२४ पर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानतंर गणेशोत्सवापर्यंत पाणीपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु पाणीपुरवठ्याचा शुभमुहूर्त पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आला आहे. शहरवासीयांना २०२५ ची वाट पहावी लागणार आहे. एकीकडे मीरा-भाईंदर शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे बहुप्रतीक्षित सूर्या प्रकल्पातून पाणीपुरवठा होण्यास विलंब होत असल्याने शहरवासीयांचे हाल होत आहेत. ऐन गणपती उत्सवामध्ये महापालिकेने शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in