भाईंंदर : मीरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत सन २०२३- २०२४ या आर्थिक वर्षात १९३ कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर महापालिका मालमत्ता कर विभागामार्फत ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत १९३ कोटीची विक्रमी कर वसुली करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरामधील बऱ्याच मालमत्ताधारकांकडे वर्षानुवर्षे थकबाकी असल्याने अशा वर्षानुवर्षे थकित असलेल्या मालमत्तांच्या बाबतीत महापालिका आयुक्त यांनी त्या मालमत्ता जप्त करण्यात याव्यात व त्यावर महापालिकेचे नाव चढवून त्या मालमत्ता जाहीर लिलावाद्वारे विक्री करण्याचे निर्देश दिले होते.
१९३ कोटी रुपये मालमत्ता कर वसुली करण्याचे श्रेय आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांनी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त (कर विभाग), नियंत्रण अधिकारी, सहाय्यक नियंत्रण अधिकारी, मालमत्ता कर विभागप्रमुख, सर्व कर निरीक्षक, कर वसुली लिपिक व कर्मचारी यांना दिले आहे.
यंदा अधिक कर जमा
मागील वर्षी ३१ मार्च २०२३ रोजी १८२ कोटी इतकी कर वसुली करण्यात आली होती. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची मालमत्ता कर वसुली वेगाने झाली आहे. ऑनलाईन पद्धतीवर विशेष भर देत १ लाख १० हजार ९७४ नागरिकांनी तर रोख रकमेद्वारे १ लाख ७३ हजार ५७३ नागरिकांनी कर भरणा करून महापालिकेस सहकार्य केले आहे. मीरा-भाईंदर महापालिका कोषाग्रहामध्ये एकूण मालमत्ता कर १९३ कोटी ८ लाख ३६ हजार २५३ इतका जमा करण्यात आला आहे.