वैद्यकीय गोळ्या बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४४ लाखांच्या पावडरचा अपहार

गोदामातून ४४ लाखांच्या वैद्यकीय गोळ्या बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिपोडोकसामाईन व सिफिकसामाईन पावडरचा अज्ञात चोरट्याने अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वैद्यकीय गोळ्या बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ४४ लाखांच्या पावडरचा अपहार
Published on

भिवंडी : तालुक्यातील राहनाळ येथील गोदामात ड्रममध्ये साठवणूक करून ठेवलेल्या ३७ लाखांच्या ॲझिथ्रोमायसीन पावडरचा अज्ञात चोरट्याने अपहार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच परिसरातील एका गोदामातून ४४ लाखांच्या वैद्यकीय गोळ्या बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिपोडोकसामाईन व सिफिकसामाईन पावडरचा अज्ञात चोरट्याने अपहार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहनाळ येथील जी.सी.केमी फार्मी लि. या गोदामात १६ ड्रममध्ये ४४ लाख ५९ हजार ६६३ रुपये किमतीची (सिपोडोकसामाईन व सिफिकसामाईन) पावडर वैद्यकीय गोळ्या तयार करण्याकरिता साठवून ती हिमाचल प्रदेश व हरयाणातील वेगवेगळ्या ४ कंपनीत पाठवण्यासाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान, १६ ऑक्टोबर २०२३ ते ३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान अज्ञात चोरट्याने १६ पैकी १३ ड्रमचे झाकण उचकटून सर्व पावडर काढून पावडरची अदलाबदल केली आहे. याप्रकरणी नवी मुंबई येथील मॅनेजर सुरेश बाळकृष्ण पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि व्ही. बी. बढे करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in