शहापुरात भात खरेदीत गैरव्यवहार!

शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळाकडून माहे ७ डिसेंबर २०२३पासून भात खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे.
शहापुरात भात खरेदीत गैरव्यवहार!

शहापूर : तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाची भात खरेदी दरवर्षी अनेक कारणांनी गाजत असते. यावर्षी शहापूर तालुक्यातील भात खरेदीत बोगस भात खरेदी झाल्याचा संशय तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून व्यक्त केला जात आहे. या झालेल्या गैव्यवहारप्रकरणी महामंडळाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे; मात्र आतापर्यंत पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळाकडून माहे ७ डिसेंबर २०२३पासून भात खरेदीस सुरुवात करण्यात आली आहे. ११ केंद्रांतर्गत भातसानगर, शेलवली, सावरोली, मुसई, चोंडे, वेहलोली, यांसह तब्बल ३७ गोदामात सुमारे २८ कोटी रुपयांचे १ लाख २८ हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. यामध्ये तालुक्यातील चरिव केंद्रामधील वेहलोलीसह चार गोदामांत ११ हजार क्विंटल भात खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांचे भात खरेदी करण्यात आले; परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर भात खरेदीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे शेतकरी भात खरेदीच्या पावत्या घेवून महामंडळाच्या कार्यालयात धाव घेत आहेत. शेतकऱ्यांच्या भात खरेदी पावत्या ऑनलाईन दिसत असल्याने आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी वर्ग संभ्रमात पडले आहेत. या भात खरेदी केंद्रावरील रोजंदारी तत्वावर काम करणारे केंद्रप्रमुख हेमंत शिंदे यांनी शेतकऱ्यांना ऑनलाईन बनावट पावत्या देऊन शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या महिन्याच्या १२ तारखेपासून हेमंत शिंदे गायब असल्याचे समजते. याबाबत शहापूर आदिवासी विकास महामंडळाचे उपप्रादेशिक व्यवस्थापक सागर सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.

logo
marathi.freepressjournal.in