

उल्हासनगर : सतत कोसळणाऱ्या भिंतीचे तुकडे, उद्ध्वस्त होणारे स्लॅब्स, आणि नावीन्याच्या नावाखाली होणारा जुन्या ढाच्यांचा वापर यामुळे उल्हासनगरात पुन्हा एकदा भ्रष्टाचारी बांधकामाचे चित्र पहावयास मिळत आहे. आरजीएस शाळेसमोरील भाजी मार्केटच्या पुनर्बांधणीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून कामाच्या ठिकाणी चक्क जुन्या भिंतींवर प्लास्टर करून नवीन बांधकाम सुरू करण्यात आले असून, संपूर्ण काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले आहे.
उल्हासनगर कॅम्प ४ येथील आरजीएस शाळेसमोरील जुने भाजी मार्केट पाडून नव्याने बांधणी करण्याचे ठेकेदाराला कंत्राट देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात नवे बांधकाम करताना जुन्याच ढाच्यांचा वापर, प्लास्टर करून बाहेरून नवे असल्याचा आभास निर्माण केला जात होता. यामध्ये सिमेंटमध्ये माती मिसळून घट्टपणा न राखता सढळपणे काम उरकले जात होते. याशिवाय जुन्याच विटांचा वापर करून संपूर्ण कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
याबाबतच्या अनेक तक्रारी भाजी विक्रेत्यांनी ठाकरे गटाचे युवासेना उपजिल्हाधिकारी राजेश कणसे यांच्याकडे केल्या होत्या. त्यानुसार राजेश कणसे यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांना दिली. बोडारे यांनी तत्काळ महापालिकेशी संपर्क साधून संबंधित ठेकेदारास काम बंद करण्याचे व दर्जेदार नव्या कामास सुरुवात करण्याचे स्पष्ट आदेश दिले. दरम्यान महापालिका अधिकाऱ्यांनी देखील बांधकामाच्या ठिकाणी भेट देऊन ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. त्यांनतर हे बांधकाम नव्या विटा आणि योग्य मिश्रण वापरून पुन्हा सुरू करण्यात आले असून, नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
लोकांच्या पैशातून होणाऱ्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. अशा भोंगळ कामांवर सातत्याने लक्ष ठेवून गरज पडल्यास आंदोलन करण्यात येईल. जनतेच्या हितासाठी शिवसेना आणि युवासेना सदैव तत्पर आहे.
- राजेश कणसे, (युवासेना उपजिल्हाधिकारी, ठाकरे गट)