
बदलापूर : अंबरनाथ व बदलापूरला पाणीपुरवठा करणारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मजीप्रा) पाणी बिलासाठी सर्वाधिक दर आकारणी करीत आहे. ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांपेक्षाही हे पाण्याचे दर अधिक आहेत. त्यामुळे बदलापूरकरांना सर्वात महागडे पाणी प्यावे लागत आहे. मात्र त्यानंतरही पाणीपुरवठा सुरळीत, सक्षम व गळतीमुक्त करण्यात मजीप्रा अपयशी ठरली असल्याचा आरोप होत आहे.
मजीप्राच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहरांना पाणीपुरवठा केला जातो. मजीप्रा येथील पाणी वितरण, देखभाल दुरुस्ती, जल उदंचन, जल शुद्धीकरण प्रकल्प चालवणे अशी कामे करते. यासाठी मजीप्राकडून आकारण्यात येत असलेले पाणी बिलाचे दर सर्वाधिक असल्याचा दावा भाजपाचे ठाणे जिल्हा महामंत्री व माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केला आहे. घरगुती वापराच्या पाण्यासाठी मजीप्राकडून प्रति हजार लिटरसाठी १३.३० रुपये दर आकारला जातो, तर प्रति हजार लिटरसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका ६.३० रु., ठाणे महानगरपालिका ६.७० रुपये व नवी मुंबई महानगरपालिका ५ रुपये याप्रमाणे बिल आकारणी करते. म्हणजेच अंबरनाथ व बदलापूर शहरातील नागरिकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सर्वाधिक महागडे पाणी प्यावे लागत असल्याचे संभाजी शिंदे यांचे म्हणणे आहे.
स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी
अंबरनाथ नगरपालिका, बदलापूर नगरपालिका यामधील विकासकामांना तांत्रिक मंजुरी देण्याची प्रक्रिया मजीप्राचे अस्तित्वातील मनुष्यबळ (स्थापत्य, विद्युत अभियंते) करत आहेत. त्यातूनही मजीप्राला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तो निधी देखील या दोन्ही शहरांतील पाणीपुरवठा सुरळीत, सक्षम व गळतीमुक्त करण्यासाठी भांडवली खर्च करण्यासाठी वापरणे गरजेचे असल्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. स्टेमच्या धर्तीवर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणीही शिंदे यांनी केली आहे.