कल्याण जिल्हा होणारच-आमदार किसन कथोरे

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी आमदार किसन कथोरे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा जिल्हा झाला पाहिजे आणि कल्याण जिल्हा होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण जिल्हा होणारच-आमदार किसन कथोरे

नामदेव शेलार /मुरबाड

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कल्याण जिल्हा तयार करावा, अशी मागणी आमदार किसन कथोरे गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. कोणत्याही परिस्थितीत हा जिल्हा झाला पाहिजे आणि कल्याण जिल्हा होणार, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच या मागणीसाठी मला केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज लागणार नाही; मात्र मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा, असा आग्रह असल्याचे ते म्हणाले आहेत.

राज्यात महायुतीचे सरकार आहे. आपलेच सरकार असताना आता जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी पूर्ण होणार का, याविषयी आमदार कथोरे यांना विचारले असता ते म्हणाले, मला केंद्राकडे पाठपुरावा करण्याची गरज लागणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्याच्यावर समितीने अहवाल दिला आहे. राज्य सरकारने त्यावर समिती स्थापन केली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा, असा आमचा आग्रह असल्याचे आमदार कथोरे यांनी म्हटले आहे.

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती. त्यातच २०११ मध्ये राष्ट्रवादी पक्षात असलेले किसन कथोरे यांनी कल्याण स्वतंत्र जिल्हा करावा, अशी मागणी केली. याविषयीचा ठराव कल्याण तालुक्याच्या आमसभेत त्या वेळी मंजूर केला होता. या प्रस्तावाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला होता. अंबरनाथ, कल्याण, मुरबाड आदी तालुक्यांतील ग्रामसभेत स्थानिक स्वराज्य संस्थांत सर्वानुमते हा ठराव मंजूर झाला आहे. कल्याण जिल्ह्याच्या निर्मितीबाबत शासनाने नेमलेल्या पिंगुळकर समितीने सुद्धा ही मागणी योग्य असल्याचा अहवाल सादर केला आहे, असे सांगितले जात आहे.

आमदार किसन कथोरे ठाम

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून, कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलिस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून, कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होईल, न्याय मिळेल.

-किसन कथोरे, आमदार

logo
marathi.freepressjournal.in