

मुंबई : मुंबई महानगर प्रदेशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि वाढत्या शहरीकरणाची गरज ओळखून एमएमआरडीएच्या बैठकीत ४८ हजार कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे. या माध्यमातून ठाणे आणि कल्याण या दोन शहरांचा कायापालट होणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ठाण्याला 'मोबिलिटी हब' म्हणून विकसित करताना कल्याण हे भविष्यातील ‘प्रगत शहरी केंद्र’ म्हणून उदयास येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे शहर हे मुंबईचे महत्त्वाचे प्रवेशद्वार मानून अर्थसंकल्पात ठाण्यासाठी १२ ते १३ हजार कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे १२ किमी लांबीचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी २०२६-२७ या वर्षाकरिता ३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून याला एकूण १८ हजार ८३८ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
याशिवाय ठाण्यात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात येत असून कासारवडवली ते वडाळा मेट्रो ४, मेट्रो ४-ए (गायमुखपर्यंत विस्तार) आणि स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो ६ या प्रकल्पांमुळे ठाणे-मुंबई कनेक्टिव्हिटी अधिक सक्षम होईल. ठाणे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी १ हजार २५ कोटी आणि आनंदनगर-साकेत उन्नत मार्गासाठी ८८० कोटी खर्च केले जाणार आहेत. त्याचबरोबर ठाण्यातील रायलादेवी आणि मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासह कोलशेत-काल्हेर खाडी पुलासाठी २१४ कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिंदे यांनी दिली.
भविष्यातील नियोजित शहरी केंद्र म्हणून कल्याण-डोंबिवली परिसराचा विस्तार होणार असून यासाठी अडीच ते साडेतीन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी १ हजार २३९ कोटींच्या कल्याण रिंग रोड या प्रकल्पासाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो ५, उल्हासनगर विस्तार ५-ए आणि कांजूरमार्ग-बदलापूर मेट्रो १४ मुळे कल्याण हे मुंबई महानगरातील महत्त्वाचे 'ट्रान्झिट हब' बनेल. ५८४ कोटी रुपये खर्चाच्या ऐरोली-काटई नाका मार्ग या प्रकल्पामुळे नवी मुंबईशी कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होईल, असेही शिंदे यांनी सांगितले.
पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा
‘एमएमआर’ क्षेत्रातील वाढती वाहतूककोंडी दूर करण्यासाठी ३३७ किमी मेट्रो जाळ्यासोबत पॉड टॅक्सी, बोट टॅक्सी, मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी, फ्लायओव्हर, अंडरग्राऊंड रस्ते आणि मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा एकत्रित आराखडा राबवण्यात येत असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली आहे.
पोशीर, शिलार धरणाला गती देण्याचे निर्देश
मुंबई महानगरातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवण्यासाठी 'पोशीर' आणि 'शिलार' या दोन्ही धरणांच्या कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत.