मराठी पाट्यांबाबत उल्हासनगरमध्ये मनसेचे ठिय्या आंदोलन

या आंदोलनात उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
 मराठी पाट्यांबाबत उल्हासनगरमध्ये मनसेचे ठिय्या आंदोलन

उल्हासनगर : न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रातील सर्व दुकानदारांनी त्यांच्या दुकानाच्या पाट्या या सप्टेंबर महिन्यापासून मराठीत लावणे बंधनकारक होते, मात्र उल्हासनगर शहरातील अनेक दुकानदारांनी न्यायालयाचा हा आदेश फाट्यावर मारत आपल्या दुकानांवरील पाट्या या मराठीत केल्या नाहीत. या विरोधात उल्हासनगर शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी आंदोलन केले.

उल्हासनगर महापालिकेत मनसे पदाधिकारी, व्यापारी आणि पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या एक बैठक पार पडली होती, ज्यात उल्हासनगर शहरातील सर्व व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानावरील बोर्ड हे मराठीत करण्यासाठी २६ जानेवारी पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु उल्हासनगर शहरातील बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानांचे नामफलक मराठीत न केल्याने मनसेने उल्हासनगर कॅम्प नंबर ३ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करण्याचे ठरवले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दुकानावरील पाट्या मराठीत झाल्याच पाहिजेत अशा घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात उल्हासनगर मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, शहराध्यक्ष संजय घुगे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in