उल्हासनगरचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकरांवर विनयभंगाचा आरोप; गुन्हा दाखल, स्पष्टीकरण देताना म्हणाले...
एक्स @JamirLengarekar

उल्हासनगरचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकरांवर विनयभंगाचा आरोप; गुन्हा दाखल, स्पष्टीकरण देताना म्हणाले...

उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कनिष्ठ लिपिकाने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Published on

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कनिष्ठ लिपिकाने अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन २०२२ ते २०२३ या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये आपल्यासोबत वारंवार अश्लील शब्दांत संभाषण केल्याची तक्रार या महिला कर्मचाऱ्याने केली आहे.

महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिने जमीर लेंगरेकर यांना वारंवार अश्लील संभाषण करण्याबाबत रोखले, तरी देखील त्यांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. या घडामोडीनंतर तिने उल्हासनगर महानगरपालिकेतील 'विशाखा समिती'कडे लेखी तक्रार दाखल केली. समितीने या तक्रारीवर चौकशी करून ५ सप्टेंबर २०२३ रोजी अहवाल सादर केला होता. मात्र तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांनी या अहवालाबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. या तक्रारीत, महिला कर्मचाऱ्याने सांगितले की, लेंगरेकर यांनी तिला वारंवार बदली करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे.

या महिला कर्मचारी यांना पुन्हा मालमत्ता विभागात बदली हवी होती. तसेच एका होल्डिंग कंपनीला उल्हासनगर महापालिकेने ४१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली होती, तो दंड कमी करावा यासाठी या महिला कर्मचारी एका शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत माझ्याकडे आल्या होत्या. मात्र मी यासाठी नकार दिला, त्यामुळे हेतूपुरस्सर माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, उल्हासनगर महानगरपालिका

logo
marathi.freepressjournal.in