
भाईंंदर : भाईंदर व मीरारोड स्थानकातून सकाळच्या वेळेत चर्चगेट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. असे असताना देखील ८.२१ आणि ८.२४ या दोन्ही सलग लोकल एसी असल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या स्थानकातून सकाळच्या सुमारास सामान्य नागरिकांची गर्दी अधिक असल्यामुळे त्यांचा कल साध्या लोकलकडे अधिक असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एसी लोकलपेक्षा साध्या लोकलची गरज अधिक असताना देखील एसी लोकल सुरू केल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. सकाळी चर्चगेटच्या दिशेने प्रवास करणाऱ्यां नागरिकांची संख्या अधिक असताना देखील सकाळी ७ ते १० या ३ तासांत केवळ ७ भाईंदर लोकल सोडल्या जात असल्याने भाईंदर व मीरारोडच्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भाईंदर व मीरारोड ही दोन्ही शहरे मुंबईला लागून असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे. शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून भाईंदर व मीरारोड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी देखील वाढती आहे. मीरारोड रेल्वे स्थानकातून सकाळी लोकल सोडावी, अशी अनेक वर्षांची मागणी प्रवाशांची असली तरी लोकप्रतिनिधी व राजकारणी यांच्याकडून त्यांना केवळ आश्वासनच मिळत आले आहे.
मीरारोडमधून लोकल सोडत नाही, निदान भाईंदर स्थानकातून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलची संख्या वाढवावी, अशी मागणी देखील नागरिकांची आहे. जेणेकरून लोकलमध्ये निदान चढणे तरी शक्य होईल, अशी माफक अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे. परंतु रेल्वे प्रशासनाला वातानुकूलित लोकलच्या संख्या वाढवून त्याचे प्रवासी वाढवायचे आहेत आणि जास्त फायदा कमवायचा असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. त्यातच भाईंदर रेल्वे स्थानकातून सकाळी ८.२४ वाजताची साधी भाईंदर-चर्चेगट लोकल रेल्वेने रद्द करत बळजबरीने वातानुकूलित लोकल प्रवाशांच्या माथी थोपली आहे. सकाळी कर्तव्यावर लवकरात लवकर पोहोचण्याच्या दृष्टीने प्रवासी धावतपळत रेल्वे स्थानक गाठतात, मात्र स्थानकावर आल्यानंतर लागोपाठ दोन एसी लोकलमुळे स्थानकाच साध्या लोकलची वाट पहावी लागत आहे.
आधीच या दोन्ही स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी असताना सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळात ३ तासांत केवळ ७ भाईंदर लोकल सोडल्या जातात. त्यातही एक एसी तर एक लेडीज स्पेशल लोकल आहे. तर एक अंधेरी व एक दादर लोकल आहे. सकाळी ७ ते १० या तीन तासांत विरार आदी भागातून मुंबईकडे जाणाऱ्या तब्बल ४८ लोकल सोडल्या जातात.
भाईंदर आणि मीरारोडच्या प्रवाशांना गर्दी व त्रास सहन करत कशीबशी लोकल पकडावी लागते. त्यामुळे मीरारोडवरून लोकल सोडण्यास मीरा-भाईंदरच्या रेल्वे प्रवाशांसाठी सकाळी गर्दीच्या वेळेत भाईंदरवरून जास्त लोकल सोडण्याची गरज आहे. मात्र जास्त लोकल सोडण्याऐवजी सकाळच्या वेळेत ८.२४ ची साधी लोकल बंद करून एसी लोकल सोडण्याची मनमानी रेल्वे प्रशासन करत आहे.
मीरा-भाईंदरच्या नागरिकांवर हा अन्याय आहे.
-राजीव मेहरा, माजी नगरसेवक