सहा वर्षात खड्डे दुरुस्तीसाठी ३० कोटीहून जास्त खर्च

मुंबईच्या अगदी लगत असल्याने मोठा भार ठाणे जिल्ह्याला सोसावा लागतो आहे
सहा वर्षात खड्डे दुरुस्तीसाठी ३० कोटीहून जास्त खर्च

ठाणे शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे. डांबरी रस्ते अवघ्या काही दिवसांत आचके देतात, किंबहुना कंत्राटदार देखील कच्चे रस्ते तयार करून पुन्हा त्या रस्त्याचे काम काढण्याची खेळी वर्षभर खेळत असतात. त्यामुळे गेली कित्येक वर्षे पालिकेच्या तिजोरीची लूट खुलेआम सुरू आहे. मात्र हा व्यवहार चव्हाट्यावर येवू लागला, तसेच रस्त्यांची चाळण होऊन वाहतूक समस्या अधिक बिकट होऊ लागल्यामुळे सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते तयार करण्याचे धोरण आखण्यात आले. गेल्या काही वर्षात सिमेंट कांक्रीटचे रस्ते तयार करण्यावर महापालिकेने कोट्यवधींचा खर्च केला आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे खड्डे दुरुस्तीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे उघड होऊ लागले आहे. गेल्या सहा वर्षात खड्डे दुरुस्तीसाठी ३० कोटीहून जास्त खर्च झालेला आहे. तर, यंदा यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईच्या अगदी लगत असल्याने मोठा भार ठाणे जिल्ह्याला सोसावा लागतो आहे. देशभरातून येणारे लोंढे वास्तव्यासाठी या परिसराचा आसरा घेउ लागल्याने नागरीकरण बरेच वाढले, झोपडपट्या वाढल्या तसेच काँक्रीटचे जंगल देखील वाढू लागले. दुसरीकडे नागरीकरण जसजसे वाढले तस तसे रस्त्यावर येणार्‍या गाड्यांची संख्या प्रचंड वाढत गेली शहरात तर आज घर तिथे गाडी नव्हे त,र घर तिथे दोन तिन किंवा त्यापेक्षा अधिक गाड्या अशी परिस्थिती आहे. परंतू, लाखो वाहनांची वरदळ होत असताना आणि त्यात दिवसेंदिवस शेकडो नव्या गाड्यांची भर पडत आहे. त्यामुळे पावसाळ्यात जुन्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात हा इतिहास आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी गेल्या काही वर्षांत बरेच प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी काही वेळा परदेशी तंत्रज्ञानाचाही मदत घेण्यात आली. मात्र, त्यालाही फारसे यश आलेले दिसत नाही. त्यामुळे, पारंपरिक पद्धतीने पुन्हा एकदा रेडीमिक्सचा वापर करूनच खड्डे बुजवण्याची कसरत महापालिका प्रशासनाकडून गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. घोडबंदर हा ठाणे ते बोरीवली, मिराभाईंदर, वसई विरार तसेच पालघर, डहाणू, तलासरीमार्गे गुजरात राज्य या मध्य तसेच पश्‍चिम मार्गांना जोडणारा एकमेव मार्ग आहे. सुरुवातीला कच्चा असणार्‍या या रस्त्याचे अवघ्या काही वर्षांपूर्वी रूंदीकरण झाले. चांगला पक्का रस्ता तयार करण्यात आला. ठाणे परिसरातून बाहेर पडणाऱ्या गाड्या, भिवंडीकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे येथील वाहतूककोंडीचा त्रास कायमचा दुर व्हावा, यासाठी कापूरबावडी जंक्शन परिसरात फ्लायओव्हर बांधण्यात आला. या रस्त्यावरून सुरळीत आणि सुसाट वाहतूक व्हावी, यासाठी अजून तीन फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात आले आहेत. मात्र या सर्वच ब्रिजवर सतत मोठंमोठे खड्डे पडत असल्याने वाहतुकीचेही तीन तेरा वाजले असल्याचे कायमचे चित्र असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in