प्रभू श्रीरामाचा दीपतेजाचा 'विश्वविक्रम'; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

या दीपोत्सवात साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये अयोध्या मंदिरासह श्रीरामाचे सर्वात मोठे चित्र काढले
प्रभू श्रीरामाचा दीपतेजाचा 'विश्वविक्रम'; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली : देशातील करोडो हिंदू बांधवांचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात सोमवारी विराजमान झाले. त्याचे औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रीडा संकुलात १ लाख ११ हजार १११ अधिक दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची दिव्य आणि तेजस्वी अशी प्रतिकृती साकारण्यात आली. याची दखल घेत याची ऑल इंडिया रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त विविध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दिव्यांच्या माध्यमातून रेखाटलेली सर्वात मोठी चित्र रांगोळी

या दीपोत्सवात साकारण्यात आलेल्या प्रतिकृतीमध्ये अयोध्या मंदिरासह श्रीरामाचे सर्वात मोठे चित्र काढले. १६० फूट रुंदी, १६० फूट उंची अशी एकूण २५६०० चौरस फूटमध्ये १लाख ११ हजार १११ (तेल दिवे) वापरून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रांगोळी कलाकार चेतन राऊत आणि शिवसेना युवा टीम सदस्यांनी हे पोर्ट्रेट डिझाइन केले होते.

समस्त कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्युत रोषणाई

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभेतील विद्युत रोषणाईचेही प्रज्वलन करण्यात आले. कल्याण-डोंबिवलीसह मतदारसंघामध्ये दहा प्रमुख ठिकाणी ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

मनसेकडून पुरातन श्रीराम मंदिरात महाआरती

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाल्याने डोंबिवलीतील ८० वर्षं पूर्ण झालेल्या श्रीराम मारुती मंदिरात मनसेकडून महाआरती करण्यात आली. यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख प्रकाश भोईर, डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत, महिला शहर अध्यक्षा मंदा पाटील, माजी नगरसेविका कोमल पाटील,सरोज भोईर, सुदेश चुडनाईक यासह योगेश पाटील, अरुण जांभळे, संदीप (रमा) नाईक, गणेश कदम, सुमेधा थत्ते, प्रमिला पाटील, विवेक भणगे, स्मिता भणगे,दीपिका पेढणेकर, प्रेम पाटील यासह अनेक पदाधिकारी आणि मनसैनिक उपस्थित होते.

अगोदर आपल्याला झोपडीमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यावे लागायचे; मात्र आता यापुढे भव्य मंदिराचे आपले स्वप्न साकार होत असून, संपूर्ण देशात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत उभारण्यात आलेल्या या प्रभू श्रीराम मंदिराच्या माध्यमांतून आपली संस्कृती आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम होईल.

- डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

logo
marathi.freepressjournal.in