कल्याण पूर्व विभागातील नांदिवली शाखेंतर्गत देसलेपाडा येथे ‘डी फिटनेस क्लब’ च्या जिम चालकाने मीटर बायपास करून तब्बल नऊ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणच्या पथकाने उघडकीस आणले आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात जिमच्या जागेचा मालक व चालकाविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रघु पुजारी (चालक) व हेमंत पाटील (मालक) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. देसलेपाड्यातील वरद विनायक रेसिडेन्सीच्या तळमजल्यावर असलेल्या ‘डी फिटनेस क्लब’ या जिमच्या वीजपुरवठ्याची तपासणी महावितरणच्या पथकाने केली. मीटरकडे येणाऱ्या केबलला लाकडी फळीच्या आतून दुसरी केबल जोडून जिमसाठी परस्पर वीजवापर सुरू असल्याचे पथकाच्या तपासणीत आढळून आले. गेल्या १४ महिन्यात जिमसाठी ९ लाख ६ हजार २२० रुपयांची ४७ हजार १५८ युनिट वीज चोरण्यात आल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात पुजारी आणि पाटील यांच्याविरुद्ध वीजचोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कल्याण पूर्व विभागांतर्गत एप्रिल २०२२ पासून ३३ लाख ६१ हजार रुपयांच्या ७१ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. यात हेमंत दरे आणि सुरेश शेट्टी यांच्या अनुक्रमे २ लाख ४० हजार व ८४ हजार रुपयांच्या वीजचोरीचा समावेश आहे. कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता पद्माकर हटकर, सहायक अभियंते रविंद्र नाहिदे, योगेश मनोरे, प्रशांत राऊत, वर्षा भांगरे, प्रधान तंत्रज्ञ जगदीश धमक, तंत्रज्ञ गणेश अहिर, राजेंद्र करनवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.