आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने विशेष नियोजन केले असून, दि. २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरसाठी एकूण १६ जादा एसटी फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन
आषाढी वारीसाठी लालपरी सज्ज; ठाणे विभागाकडून पंढरपूरसाठी १६ जादा एसटी फेऱ्यांचे नियोजन प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाने विशेष नियोजन केले असून, दि. २० जुलै ते ३० जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूरसाठी एकूण १६ जादा एसटी फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, शहापूर, मुरबाड, वाडा तसेच बोरिवली येथून या विशेष बससेवा उपलब्ध होणार आहेत.

दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने लाखो वारकरी आणि भाविक पंढरपूरकडे रवाना होतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे विभागाने विविध मार्गांवर जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे.

या सर्व जादा फेऱ्यांसाठी संगणकीय तसेच समूह आरक्षणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आरक्षणाची स्थिती दैनंदिन तपासून आवश्यकतेनुसार अतिरिक्त आरक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच दि. २५ ते ३० जुलैदरम्यान पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून परतीच्या प्रवासासाठीही विशेष बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिला प्रवाशांना प्रवास सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे भाविकांनी संबंधित आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधून आगाऊ आरक्षण करावे आणि सुरक्षित, आरामदायी व सोयीस्कर प्रवासासाठी एसटी बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ठाणे विभागाने केले आहे.

विशेष बससेवेचे मार्ग पुढीलप्रमाणे

  • बोरिवली (नॅन्सी कॉलनी)-सायन-पंढरपूर: ४ फेऱ्या

  • ठाणे-फलटण-पंढरपूर : ४ फेऱ्या

  • भिवंडी-कल्याण-फलटण-पंढरपूर : ३ फेऱ्या

  • शहापूर-ठाणे-फलटण-पंढरपूर: १ फेरी

  • कल्याण-विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर : १ फेरी

  • मुरबाड-कल्याण-नगर-फलटण-पंढरपूर : १ फेरी

  • विठ्ठलवाडी-नगर-फलटण-पंढरपूर: १ फेरी

  • वाडा-ठाणे-पुणे-पंढरपूर: १ फेरी

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in