मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या दारी! बालेकिल्ल्यातील १५ लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन घेतली भेट

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे सरकारमधील तीनही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसन नगर भागापासून मंगळवारी सुरुवात केली.
मुख्यमंत्री लाडक्या बहिणींच्या दारी! बालेकिल्ल्यातील १५ लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन घेतली भेट
Published on

ठाणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून एकीकडे सरकारमधील तीनही पक्षात श्रेयवादाची लढाई सुरू असताना आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट या योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील किसन नगर भागापासून मंगळवारी सुरुवात केली. ठाण्यातील १५ लाडक्या बहिणींच्या थेट घरी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेचा आढावा घेतलाच मात्र सरकारच्या इतर योजनांची माहिती देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने विधानसभा निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

शासनाच्या १० महत्त्वाच्या योजनांची माहिती घरोघरी देण्यासाठी राज्यात १० सप्टेंबरपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अभियानाचा नारळ ठाण्यातून फोडत किसन नगर परिसरातील १५ कुटुंबांची भेट घेऊन शुभारंभ देखील केला. या अभियानाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घरोघरी जाऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सरकारमधील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रावादीमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट दादांचा वादा असा प्रचार करून या योजनेच्या नावामधील मुख्यमंत्री नाव काढून ही योजनाच हायजॅक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. मात्र आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मैदानात उतरले असून त्यांनी ठाण्यातील १५ लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन योजनेचा आढावा घेण्यासोबतच शासनाच्या योजनांची माहिती देखील त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बालेकिल्ला असलेल्या किसन नगरमधील बहिणींच्या घरी जाऊन प्रत्यक्षात भेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या घरी आल्याने अनेक बहिणांना आश्चर्याचा धक्का बसला. तर काही बहिणींनी मुख्यमंत्र्यांशी मुक्तपणे संवाद साधला. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक, वारकरी, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच घटकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. तर प्रत्येक शिवसैनिक या योजनेचा आढावा घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आमच्यात कोणत्याही प्रकारचा श्रेयवाद नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in