नैसर्गिक नाले बुजल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली जाणार! आगरी कोळी संघटनेच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाचे पितळ उघड

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. एक एक आठवडा महामार्ग पाण्याखाली राहिल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा उडतो.
नैसर्गिक नाले बुजल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली जाणार! आगरी कोळी संघटनेच्या पाहणी दौऱ्यात प्रशासनाचे पितळ उघड

अनिलराज रोकडे/ वसई

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. एक एक आठवडा महामार्ग पाण्याखाली राहिल्याने वाहतुकीचा खेळखंडोबा उडतो. वाहनचालक, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. महामार्गावर घोडबंदर ते बापाने गुजरात च्या दिशेने येताना डाव्या बाजूला विशेषतः मालजीपाडा, ससूनवघर, बापाने, जूचंद्र, चंद्रपाडा आणि लगतच्या गावात खाजन, खारफुटी, दलदल जागा आहे. या जागेमध्ये अनधिकृतपणे २५ ते ३० फूट मातीचा भराव करण्यात आला असून यामुळे संपूर्ण महामार्गात पावसाळी नैसर्गिकरीत्या पाणी वाहून नेणारे नाले पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी त्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत त्यामुळे यंदाही मुंबई-अहमदाबाद महामार्ग पाण्याखाली जाणार अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

गेले तीन वर्षे पावसाळ्यात महामार्ग पाण्याखाली जाऊन गंभीर समस्या निर्माण होत आहे. तसेच गतवर्षी हा प्रश्न अधिक चिघळून त्यावर उपाययोजनेबाबत आणभाका घेतल्या गेल्या होत्या. मात्र आता एक वर्ष उलटूनही जिल्हाधिकारी, महानगरपालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी या उघड्या मोकळ्या करून कायमस्वरूपी बांधल्या नाहीत. परिणामी यंदा पुन्हा महामार्ग पाण्याखाली जाणार आहे. महामार्गावर पाणी साचण्याचे मुख्य कारण घोडबंदर, मुंबईच्या दिशेने जाताना बापाने पासून उजव्या बाजूने खाजण, खारफुटी जमिनीतील हजारो तिवरांची झाडे तीस ते पस्तीस फूट मातीचा भराव करून त्याखाली गाढली गेली आहेत. त्याचबरोबर या भागातील पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या अनेक ब्रिटिशकालीन नैसर्गिक नाले मातीचा भराव करून काही ठिकाणी अरुंद, तर काही ठिकाणी बंद करण्यात आले आहेत. माती भराव केलेल्या ठिकाणी मोठमोठ्या पत्र्याच्या अनधिकृत शेड बांधण्यात आलेल्या आहेत. शेवटचा मातीचा भराव ज्या ठिकाणी केलेला आहे, त्या ठिकाणी दहा ते पंधरा फुटांची तिवरांची झाडे कापण्यात आलेले आहेत. मोठमोठे नैसर्गिक नाळे बंद करून त्यांचे छोट्या गटारात रूपांतर करण्यात आले आहे. गटाराच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम बांधण्यात आलेले असून, काही ठिकाणी अजूनही भरणी आणि बांधकामे सुरू आहेत.

आंदोलनाचा इशारा

आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष भूपेश कडुलकर यांनी गत महिन्यातील आंदोलन मागे घ्यावे, म्हणून महसूल विभागाने त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या कडुलकर यांनी, येत्या ३१ मे पर्यंत पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या नैसर्गिक नाले महापालिका, महामार्ग प्राधिकरण आणि महसूल विभाग यांनी कार्यवाही करून खुल्या न केल्यास आता मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्वाणीचा इशारा आगरी कोळी संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली जातो. राष्ट्रीय दळणवळण पूर्णपणे ठप्प होते. त्याचा खूप मोठा फटका राज्यपातळीवर व देशपातळीवर मालवाहतुकीला बसतो. महामार्गावरील सर्व वाहतूक सेवा बंद पडते. अनेक व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा फटका बसतो. तलाठी, मंडळ अधिकारी, महानगरपालिकेतील अधिकारी यांना वारंवार तक्रारी करून देखील या ठिकाणी कारवाई केली जात नाही. या ठिकाणी होत असलेल्या माती भराव आणि अवैध बांधकामातून स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळतो, असे वारंवार सांगितले जाते. आजच ससूनवघर, मालजीपाडा, बापाने, जूचंद्र, चंद्रपाडा येथील सकल भागातील स्थानिकांच्या घरात आता पावसाचे पाणी जाऊ लागले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in