घाम येत होता म्हणून दरवाजाकडे गेला...आणि आयुष्यच संपले! उल्हासनगरच्या केतनच्या मृत्यूची हकीकत; डोळ्यांदेखत मित्राचा शेवट

घाम येत होता म्हणून तो क्षणभर दरवाजा जवळ गेला आणि त्या क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्यच हिरावले. दिवा-मुंब्रा लोकल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरचा २३ वर्षीय केतन सरोज याने आपले प्राण गमावले.
घाम येत होता म्हणून दरवाजाकडे गेला...आणि आयुष्यच संपले! उल्हासनगरच्या केतनच्या मृत्यूची हकीकत; डोळ्यांदेखत मित्राचा शेवट
Published on

उल्हासनगर : घाम येत होता म्हणून तो क्षणभर दरवाजा जवळ गेला आणि त्या क्षणाने त्याचे संपूर्ण आयुष्यच हिरावले. दिवा-मुंब्रा लोकल मार्गावर झालेल्या भीषण अपघातात उल्हासनगरचा २३ वर्षीय केतन सरोज याने आपले प्राण गमावले. रोजची नेहमी सारखीच सुरुवात, मात्र शेवट मात्र काळजाला चिरून टाकणारा ठरला. या अपघाताने केवळ एका तरुणाचे नव्हे तर एका कुटुंबाच्या आशा-आकांक्षांचाही अंत झाला आहे.

दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून खाली पडून उल्हासनगरच्या केतन दिलीप सरोज (वय २३) या तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. केतन मित्रासोबत दररोजप्रमाणे शहाड स्थानकातून सकाळी ८:३० वाजताच्या लोकलने ठाण्याकडे निघाला होता. पण याच प्रवासात एका क्षणाने सर्व काही बदलून टाकले. गर्दी, लोकलचा वेग आणि शेजारून येणाऱ्या दुसऱ्या लोकलचा धक्का यात केतनचा जीव गेला.

घटनेची माहिती त्याचा मित्र दीपक शिरसाठ याने दिली. थोडा घाम येत असल्यामुळे केतनने लोकलच्या दरवाजाजवळ उभे राहणे पसंत केले. दिवा स्थानकात गाडी थांबली आणि ती पुन्हा सुरू होताच गर्दी अधिकच वाढली. मुंब्रा स्थानकाजवळ शेजारून एक लोकल वेगाने गेली आणि त्यातील प्रवाशाच्या बॅगचा धक्का लागल्यामुळे केतनसह इतर काही प्रवासी खाली पडले, अशी माहिती दीपकने दिली. घटना घडताच दीपक आणि इतर प्रवाशांनी साखळी ओढून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकल थेट ठाणे रेल्वे स्थानकातच थांबली. तिथून केतनला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

केतन सरोज हा उल्हासनगर कॅम्प १ येथील हनुमान नगर परिसरात आई-वडील आणि दोन लहान भावांसोबत राहत होता. बेताच्या परिस्थितीतून त्याने उच्च शिक्षण घेतले होते. पाच महिन्यांपूर्वी त्याला ठाण्यातील वागळे इस्टेटमधील एका कंपनीत नोकरी मिळाली होती. वडील दिलीप सरोज हे इलेक्ट्रिक वस्तू दुरुस्तीचे काम करतात. केतनचे दोघे भाऊ शिक्षण घेत आहेत. त्यामुळे संपूर्ण घराची जबाबदारी केतनवरच होती.

शेजारी राजेंद्र शिरसाठ यांनी सांगितले की, माझा मुलगा दीपक आणि केतन लहानपणापासूनच सोबत होते. दोघेही दररोज सकाळी शहाडहून लोकलने जात. केतनचा अचानक जाण्याने आमच्या पायाखालची जमीनच सरकली.

अपघातानंतर उल्हासनगरच्या हनुमाननगर परिसरात शोककळा पसरली आहे. शेजाऱ्यांनी आणि मित्रमंडळींनी केतनच्या घरासमोर गर्दी केली. सगळ्यांच्याच डोळ्यांत अश्रू होते. एक होतकरू, जबाबदार मुलगा आणि एकुलता एक आधारवड हिरावल्याने सरोज कुटुंबीयांचे दुःख शब्दांत सांगणे अशक्य आहे, अशीच भावना व्यक्त होत आहे.

घराचा आधार हरवला

केतन दिलीप सरोज. अवघ्या २३ वर्षांचा. पण जबाबदाऱ्या मात्र प्रौढांसारख्या. उल्हासनगरच्या हनुमाननगरमध्ये आई-वडील आणि दोन भावांसह राहणारा हा तरुण गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यातील एका मार्केटिंग कंपनीत काम करत होता. पगार होता २० हजार रुपये. पण त्याच पैशांत तो घर चालवायचा. लहान भावांची काळजी घ्यायचा, आईवडिलांचा आधार बनायचा. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे शहाडहून ठाण्याकडे लोकलने निघालेला केतन, मुंब्रा स्थानकाजवळ लोकलच्या दरवाज्यात उभा असताना अचानक समोरून आलेल्या लोकलमधून लागलेल्या धक्क्याने गाडीतून खाली पडला आणि जागीच मृत्यू पावला. केतनच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच घरात शोककळा पसरली.

logo
marathi.freepressjournal.in