मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा

Mumbai Metro Line 5 : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ ने मंगळवारी (दि.१७) महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. एमएमआरडीएच्या कशेळी डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले.
मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा
मेट्रो-५ च्या कशेळी डेपोत पहिल्या गाडीचे आगमन; ठाणे-भिवंडी-कल्याणच्या प्रवाशांना मिळणार दिलासा छाया सौजन्य : MMRDA चे एक्स अकाउंट
Published on: 

प्रवासी सेवेसाठी सज्ज होण्याच्या दृष्टीने ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिका ५ ने मंगळवारी (दि.१७) महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला. एमएमआरडीएच्या कशेळी डेपोमध्ये पहिल्या मेट्रो ट्रेनचे आगमन झाले. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गिकेसाठी कशेळी डेपोची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या डेपोमध्ये मेट्रो गाड्या उभ्या करणे, त्यांची तपासणी, चाचणी आणि देखभाल केली जाणार आहे.

कशेळी डेपोत एकाचवेळी ३० मेट्रो थांबणार

डेपोचे काम सुरू असतानाच गाड्यांच्या आगमनासाठी आवश्यक असलेल्या प्रमुख सुविधाही उभारण्यात आल्या आहेत. यामध्ये कोच लोडिंग-अनलोडिंग प्लॅटफॉर्म आणि तात्पुरत्या तपासणी सुविधेचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो गाड्यांचे स्वागत आणि प्राथमिक तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक व्यवस्था सज्ज झाली आहे. २७ हेक्टर क्षेत्रावर विस्तारलेल्या या डेपोमध्ये सुमारे ३० मेट्रो ट्रेन संच सामावण्याची क्षमता असणार आहे. यामध्ये पाच तपासणी मार्गिका, चार कार्यशाळा मार्गिका, स्वतंत्र चाचणी मार्ग आणि मेट्रो गाड्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष सुविधांचा समावेश आहे. या सर्व सुविधांच्या माध्यमातून मेट्रो मार्गिका ५ वरील गाड्यांची दैनंदिन प्रवासी सेवेसाठी आवश्यक सज्जता आणि कार्यक्षमता कायम राखण्यास मदत होणार आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत बाळकुम ते धामणकर नाका सेवा?

मेट्रो ५ मार्गिकेवर ठाण्यातील बाळकुम ते धामणकर नाका हा पहिला टप्पा असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या मार्गावर सुरक्षा चाचण्या घेऊन किमान नवीन वर्षात येथील सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, दिवाळीआधी मेट्रो ५ आणि ५-अच्या विस्तारित मार्गिकांसाठी ४ हजार ५६४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या. त्यामुळे उल्हासनगरपर्यंत मेट्रो धावण्याच्या स्वप्नाला नवे बळ मिळाले असून, ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ या पाच शहरांच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे परिवर्तन घडण्याची अपेक्षा आहे.  या प्रकल्पातील विशेष बाब म्हणजे रांजणोली ते दुर्गाडी परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलाची डबल डेकर मार्गिका उभारण्यात येणार आहे. तसेच जगदीश दूध डेपो परिसरापासून उल्हासनगरपर्यंत डबल डेकर मार्गिकेचे नियोजन करण्यात आले आहे.

भुयारी आणि उन्नत मार्गिकेचा समावेश

मेट्रो ५च्या पहिल्या टप्प्यात कापूरबावडी ते धामणकर नाका या मार्गाचे काम सुरू आहे. पुढील टप्प्यात धामणकर नाका ते रांजणोली आणि दुर्गाडीमार्गे भोईरवाडीपर्यंत मेट्रोचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो ५-अ अंतर्गत भोईरवाडी ते कल्याण रेल्वे स्थानक आणि पुढे उल्हासनगरमार्गे अंबरनाथ येथील जीएनपी गॅलेक्सीपर्यंत मेट्रोचा विस्तार प्रस्तावित आहे. त्यामुळे या शहरांमधील प्रवाशांना मेट्रोच्या माध्यमातून जोडणी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.