नाशिकहून मुंबईकडे येणारा महामार्ग ठप्प, तब्ब्ल १२ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा; वासिंद उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूककोंडी

दररोज होणाऱ्या या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह स्थानिक जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
नाशिकहून मुंबईकडे येणारा महामार्ग ठप्प, तब्ब्ल १२ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा; वासिंद उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूककोंडी
Navshakti

शहापूर : मुंबई - नाशिक महामार्गावरील वासिंद येथील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. मुंबई व नाशिककडे जाणाऱ्या या मार्गावर दररोज ५ किमीच्या लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आज (रविवारी) नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर तब्ब्ल १२ किलोमीटरच्या वाहनांचा ट्राफिक लागलाय. दररोज होणाऱ्या या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांसह स्थानिक जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मुंबई - नाशिक महामार्ग पूर्ण होऊन दहा वर्षे झाल्यानंतर देखील रस्ते अपघातात अनेकांनी जीव गमावले होते. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर महामार्ग प्रशासनाने वासिंद येथील चक्रधारी हॉटेलसमोर उड्डाणपूल बांधण्यास मंजुरी दिली. मागील दोन ते तीन वर्षांपासून या उड्डाणपुलाचे काम हे संथगतीने सुरू असून अजून १ - २ वर्षात तरी ते पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाही. अशातच या उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने मुंबई व नाशिक मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने तात्पुरता सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. मात्र तो रोड दगड व माती टाकून कच्च्या स्वरूपात तयार करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात पर्यायी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. या खड्डेमय रस्त्यातून महामार्गावरील वाहतूक करणारे ट्रक, कंटेनर धिम्यागतीने जात असल्याने या पर्यायी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते.

महामार्गावरील लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक जनतेला देखील या वाहतूककोंडीचा फटका बसत असून वासिंदच्या मागे कोशिंबी तर आसनगावपर्यंत ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागत असल्याने स्थानिक जनतेची देखील हाल होत आहेत.

मुंबई - नाशिक एक्स्प्रेस वे अधिकारी

उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस असलेले नादुरुस्त सर्व्हिस रस्ते दोन दिवसांत सुस्थितीत करून वाहतुकीसाठी सुरळीत केले जाईल. तसेच वाहतूककोंडीच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक ठेऊन वाहतूककोंडीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in