
भाईंंदर : मीरारोड पूर्वेतील सफा टॉवर इमारतीच्या सुरक्षा कॅबिनमध्ये राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१४ ऑगस्ट रोजी सुरक्षारक्षक असलम अब्दुल जलाल शेख यांची मुलगी फातिमा असलम शेख (१६) हिने वॉचमन केबिनमध्येच ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ती बेशुद्ध पडल्याचे लक्षात येताच तिच्या कुटुंबीयांनी तिला तत्काळ जवळच्याच एव्हरशाईन रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी तिला भाईंदर पश्चिमेतील पंडित भीमसेन जोशी शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला.
यानंतर तिला तातडीने चारचाकी वाहनाने शासकीय रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून मुलगी दाखल होण्यापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची नोंद १५ ऑगस्ट रोजी रात्री नयानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.