'अख्खं मुंब्रा हिरवं करायचंय' वादग्रस्त विधानावर एमआयएम नगरसेविका सहर शेखचं स्पष्टीकरण, म्हणाल्या - "माझ्या पक्षाचा...

नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून विजयी झालेल्या AIMIM च्या २२ वर्षीय आणि पक्षाच्या सर्वात तरुण महिला नगरसेविका सहर शेख चर्चेत आहेत.
'अख्खं मुंब्रा हिरवं करायचंय' वादग्रस्त विधानावर एमआयएम नगरसेविका सहर शेखचं स्पष्टीकरण, म्हणाल्या - "माझ्या पक्षाचा...
Published on

नुकत्याच पार पडलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक ३० मधून विजयी झालेल्या AIMIM च्या २२ वर्षीय आणि पक्षाच्या सर्वात तरुण महिला नगरसेविका सहर शेख चर्चेत आहेत. विजयानंतरचा त्यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून आक्रमक भाषण करताना त्यांनी केलेले 'आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगात रंगून टाकायचे आहे' हे वक्तव्य सध्या केंद्रस्थानी आलंय. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाला असून आता सहर शेख यांनी स्पष्टीकरण दिलंय.

एका व्हिडिओमध्ये सहर शेख यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. "माझ्या हातात भगवा आणि हिरवा अशा दोन रंगांचे दोन धागे आहेत. माझ्या पक्षाचा झेंडा हिरव्या रंगाचा आहे, जर भगवा रंग असता तर मुंब्रा भगव्या रंगात रंगवा असं मी म्हणाले असते. रंग थोडीच कोणत्या धर्माशी जोडला जातो", असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना, "ते सांप्रदायिक विधान नव्हतं, मी स्वतः सेक्यूलर विचारांची आहे, त्यामुळे सांप्रदायिक विधान माझ्या तोंडून कधीच निघणार नाही" असंही त्या म्हणाल्या. 'मी बोलले तो सटायर पंच होता. त्याचा अर्थ प्रत्येक घर हिरवे करणे असा नव्हता. मुंब्रातील सर्व २५ जागा पाहिजेत, त्यासाठी ते विधान केलं होतं,' असे त्यांनी सांगितले. या मुद्द्याला सांप्रदायिक रंग देणं थांबवा असं आवाहनही त्यांनी केलं. वृत्तसंस्था एएनआयकडेही त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं.

विजयानंतर आक्रमक भाषण, जितेंद्र आव्हाडांनाही डिवचलं

सहर शेखचे वडील युनूस शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून मुंब्रा ब्लॉक अध्यक्ष होते. काही वर्षांपूर्वी त्यांचा आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडिओही समोर आला होता. त्यामुळे दोघांमधील वाद चव्हाट्यावर आला. युनूस शेख यांनी यावेळी आपल्या मुलीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे तिकीट मागितले होते. पण, उमेदवारी नाकारल्याने अखेर सहर यांनी एमआयएमकडून निवडणूक लढली आणि विजयी झाल्या. विजयानंतर आयोजित सत्कार समारंभात बोलताना सहर शेख यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधकांवर जोरदार हल्लोबल केला होता. “आमच्या विरोधकांना वाटत होतं की AIMIM नामशेष होईल. पण आम्ही रणनीतीने आणि ठामपणे ही निवडणूक लढलो आणि विजय मिळवला,” असे त्या म्हणाल्या. भाषणात त्यांनी स्वतःची तुलना सिंहाच्या छाव्याशी करत, “माझ्याविरुद्ध संपूर्ण गिधाडांची फौज उभी केली होती, तरीही ती मला पराभूत करू शकली नाही,” असेही म्हटले. "आम्हाला कोणाच्या वरदहस्ताची गरज नाही. आम्ही त्यांच्या अहंकाराला मातीमोल केलं आहे, ज्यांना असं वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत, ते हे विसरले की आम्ही फक्त आणि फक्त 'अल्ला'चे मोहताज आहोत. आम्ही कोणाच्या बापाच्या मेहेरबानीवर अवलंबून नाही".  सहार शेख यांच्या भाषणातील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे पुढील पाच वर्षांबाबत केलेली घोषणा. 'पाच वर्षांनी पुन्हा निवडणूक होईल, तेव्हा यापेक्षा मोठं प्रत्युत्तर द्यायचं आहे. पुढील पाच वर्षांत मुंब्रातून उभा राहणारा प्रत्येक उमेदवार AIMIMचाच असेल. संपूर्ण मुंब्रा हिरव्या रंगाने व्यापून टाकायचा आहे” अशी आक्रमक घोषणा त्यांनी मंचावरून केली आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, आगामी काळात मुंब्राच्या राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in