मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!

उल्हासनगरातून प्रदूषणाच्या कारणास्तव हद्दपार झालेल्या जीन्स धुलाई उद्योगांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला असून, त्यांच्या मनमानीमुळे थेट निर्माणाधीन मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेलाच ‘जीन्स सुकवण्याचा अड्डा’ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेवर 'जीन्सराज'; महामार्गच बनला 'जीन्स सुकवण्याचा अड्डा'!
Published on

उल्हासनगर : उल्हासनगरातून प्रदूषणाच्या कारणास्तव हद्दपार झालेल्या जीन्स धुलाई उद्योगांनी आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळवला असून, त्यांच्या मनमानीमुळे थेट निर्माणाधीन मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेलाच ‘जीन्स सुकवण्याचा अड्डा’ बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बदलापूर परिसरात एक्स्प्रेस वेच्या एका मार्गिकेवर शेकडो जीन्स पसरवून वाळत घातल्याचे चित्र दिसून आल्याने प्रदूषणकारी उद्योगांवर नेमका अंकुश कुणाचा, असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या जीन्स धुलाई उद्योगांमुळे जलप्रदूषण आणि पर्यावरणाची हानी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी संबंधित यंत्रणांकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर शहरातून हद्दपार झालेले अनेक उद्योग आता अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यांतील ग्रामीण भागात अनधिकृतपणे सुरू असल्याचे समोर येत आहे.

विशेष म्हणजे, निर्माणाधीन मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या मार्गिकेवर टेम्पोमधून मोठ्या प्रमाणात जीन्स आणल्या जात असून, त्या थेट रस्त्यावर पसरवून वाळवल्या जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या एक्स्प्रेस वेचा अशा प्रकारे व्यावसायिक वापर होत असल्याने संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित ठिकाणी तपासणी करून नियमबाह्य आणि प्रदूषणकारी उद्योग आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. आता प्रदूषणकारी जीन्स धुलाई उद्योगांविरोधात संबंधित यंत्रणा प्रत्यक्षात किती वेगाने आणि कठोर कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

जलप्रदूषणाचा धोका

जीन्स धुलाईसाठी वापरण्यात येणारे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्यास त्याचा ग्रामीण भागातील जलस्रोत, शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा उद्योगांवर तातडीने नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in