
उल्हासनगर : दहशतवाद्यांच्या अमानुष हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पाकिस्तानातून आलेल्या नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले असताना, उल्हासनगरातील सिंधी हिंदू कुटुंबांच्या व्यथेला दिलासा मिळाला आहे. विस्थापनाच्या जखमा घेऊन भारतात आलेल्या या कुटुंबांना आमदार कुमार आयलानी यांच्या मध्यस्थीने तात्पुरती स्थगिती मिळाली असून, या निर्णयामुळे त्यांची 'भारतात राहण्याची आशा' पुन्हा जिवंत झाली आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे यात्रेकरूंवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने देशात असलेल्या अल्पकालीन व्हिसावरील पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांची पोलिसांकडून तातडीने छाननी करण्यात आली. या १७ नागरिकांपैकी ७ जण उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या, ८ जण मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या तर २ जण विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते.
बऱ्याच पाकिस्तानी नागरिकांना देशातून परत पाठवण्यात आले आहे, तर उर्वरितांनी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्तक्षेपाने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याशी चर्चा करून दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज सादर करत अटी आणि शर्तींच्या आधारे तात्पुरती स्थगिती मिळवली आहे.
आमदारांच्या मध्यस्थीने तात्पुरती परवानगी
या पार्श्वभूमीवर थेराणी कुटुंब - मुकेश थेराणी (४८), पत्नी कौंशा देवी (४४), मुलगी हरिप्रिया (२०), राधे (१६) आणि मुलगा ऋषिकेश (१३) - हे पाकिस्तानच्या उथल प्रांतातून उल्हासनगरमध्ये आले असून, त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तसेच, जेठा मल (४८) आणि ऐश्वर्या देवी (४५) या कुटुंबालाही भारतात राहण्याची तात्पुरती परवानगी आमदार कुमार आयलानी यांच्या मध्यस्थीने मिळाली आहे.
आमच्यासाठी खूप समाधानकारक
जरी आम्ही पाकिस्तानात जन्मलो असलो, तरी तिथे स्वातंत्र्य नव्हते. भारतात येऊन माणूस म्हणून जगण्याचा खरा अर्थ कळतो. त्यांचे मेहुणे दिलीप जयसिंघानी यांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, आमची बहीण आणि तिचे कुटुंब आता आमच्यासोबतच उल्हासनगरमध्ये राहतील. हे आमच्यासाठी खूप समाधानकारक आहे.
या नागरिकांपैकी बहुतांश जण सिंधी हिंदू समाजाचे आहेत, जे फाळणीनंतर पाकिस्तानात अडकले होते. काही नागरिक २७ व २८ एप्रिल रोजी पाकिस्तानात परतले असून, दीर्घकालीन व्हिसावर येणाऱ्यांसाठी अद्याप केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत.
- सचिन गोरे, पोलीस उपायुक्त