
ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील अनधिकृत असलेल्या ८१ शाळा अनधिकृत म्हणून घोषीत केल्या आहेत. तसेच काही शाळांच्या विरोधात फौजदारी कारवाई देखील केली आहे. परंतु असे असतानाही आजही अनेक शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश दिला जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा पालकांमध्ये अनधिकृत शाळांबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला असून आपल्या पाल्ल्यांचा त्या शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ज्या शाळा अनधिकृत आहेत, त्यांनी त्या शाळा तत्काळ बंद कराव्यात, अशा सूचनाही महापालिकेच्या शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी अनाधिकृत शाळांची यादी जाहीर केली जात आहे. त्यातही काही शाळांवर कारवाई होते, तर काही शाळा या सुरूच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातही शाळा मंजुरीसाठी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगून खासगी अनधिकृत शाळेवाले विद्यार्थ्यांना प्रवेश देत आहेत. या शाळांची नोंदणी नाही, काही अनधिकृत शाळा अनधिकृत इमारतीत आहेत. काही अनधिकृत शाळा निवासी इमारतीत भाडेतत्त्वावर सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिृकत शाळांच्या स्थितीचा नुकताच आढावा घेऊन शहरातील अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले होते.
परंतु आता पुन्हा नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने पुन्हा या ८१ शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन केले आहे. या माध्यमातून जनजागृती देखील केली जात आहे. ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांच्या यादीत दिव्यातील सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. तसेच ८१ पैकी ७८ शाळा या इंग्रजी माध्यमाच्या असून हिंदीच्या दोन आणि मराठी माध्यमाच्या एका शाळेचा त्यात समावेश आहे.
१९७०८ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात
अनधिकृत शाळांविरोधात प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत ८१ अनधिकृत शाळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यापैकी ६८ शाळांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर, १३ शाळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ८१ अनधिकृत शाळा असून त्यात १९७०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी त्यांचे इतर अधिकृत खासगी शाळांमध्ये समायोजन करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले होते. मात्र काही कारणास्तव तेही केवळ कागदावरच असल्याचे म्हटले जात आहे. अनधिकृत शाळांबाबत पालिका प्रशासन कडक कारवाई का करत नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.
अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी
भिवंडी : भिवंडी पालिका प्रशासनाने शहरात १८ अनधिकृत प्राथमिक शाळा सुरू असल्याची यादी जाहीर केली असून अशा शाळांमधून पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश करू नये, असे आवाहन केले आहे. परंतु या शाळा गेल्या काही वर्षांपासून सुरू असून त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे या शाळा चालकांचे फावले असते. पालिका प्रशासनाने अशा अनधिकृत शाळांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्या तत्काळ बंद कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष परेश चौधरी यांनी पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन देऊन केले आहे. अनधिकृत शाळांवर १ लाख रुपयांचा दंड व त्यानंतरही शाळा सुरू राहिल्यास प्रति दिवशी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, असे पत्र प्रशासनाने देऊनही या अनधिकृत शाळा बंद झाल्या नाहीत.