ठाणे : मुंब्य्राच्या जीवनबाग येथील बानू टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळून घरात असलेली ५ वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी आपत्ती विभागाने धाव घेत ही इमारत रिकामी करून सील केली आहे.
रविवारी सकाळी ८ वाजल्याच्या सुमारास मुंब्य्रातील जीवनबाग परिसरातील बानु टॉवर बी विंगमधील या ५ मजली जुनी इमारतीच्या तळमजल्याचा स्लॅब कोसळला. त्यावेळी घरात असलेल्या ५ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला तर घरातील इतर ३ जण किरकोळ जखमी झाले आहेत. मयत मुलीचे नाव उनेजा शेख असून रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनास्थळी मुंब्रा पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, सार्वजानिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या इमारतीमध्ये एकूण २० सदनिका व ६ गाळे असून इमारत सी २ बी प्रवर्गात येत असून इमारतीमधील संबंधित रहिवाशांना दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.