Thane : मुंब्र्यात छेडछाडीच्या वादातून तिघांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे जखमी

मुंब्र्यात छेडछाडीच्या वादातून एका व्यक्तीने तिघांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.
Thane : मुंब्र्यात छेडछाडीच्या वादातून तिघांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Thane : मुंब्र्यात छेडछाडीच्या वादातून तिघांवर गोळीबार; एकाचा मृत्यू, दोघे जखमी
Published on

ठाणे : मुंब्र्यात छेडछाडीच्या वादातून एका व्यक्तीने तिघांवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. गुरुवारी सकाळी कैलासनगर परिसरात ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंब्रा येथील कैलासनगर भागातील सुमनताई चव्हाण हिंदी प्राथमिक विद्यालयाजवळील बिस्मिल्ला चाळीत ही घटना घडली. जयन शिवानंदन नायर (५१) याच्या मानलेल्या बहिणीची काही जणांनी छेड काढल्याचा आरोप आहे. या कारणावरून संबंधितांमध्ये आधी वाद झाला होता. हा वाद चिघळल्यानंतर जयनने संतापाच्या भरात तिघांवर गोळीबार केला.

या गोळीबारात अब्दुल हसन शेख, अकबर अब्दुल शेख आणि समीर अहमद शेख हे तिघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर आरोपी जयन घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, मुंब्रा पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान अकबर अब्दुल शेख यांचा मृत्यू झाला, तर उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहेत.

या भागातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

पोलिसांचा खुलासा

मानलेल्या बहिणीची छेड काढल्याच्या कारणावरून हा गोळीबार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आरोपी जयन शिवानंदन नायर याला अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in