मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

मुंब्रा आणि कळवा भागातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारींवर प्रतिसाद म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका मुख्यालयावर धडक आंदोलन केले, तर कळव्यात भाजपकडून पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला आणि मडकी फोडून निषेध नोंदवला.
मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
Published on

ठाणे : मुंब्रा आणि कळवा भागातील रहिवाशांना सध्या पाणीटंचाई समस्येचा सामना करावा लागत आहे. या समस्येला अनेक काळापासून सामोरे जात असताना नागरिकांसाठी पुढाकार घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका मुख्यालयावर धडक आंदोलन केले. तर कळव्यात भाजपच्यावतीने पाण्यासाठी आक्रोश मोर्चा काढत मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला. दोन्ही ठिकाणी नागरिकांनी प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नाराजी व्यक्त केली.

मुंब्र्यातील पाण्याची समस्या दसऱ्यापूर्वी सोडवली नाही, तर ठाणे महापालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यालयात बंद करू, असा इशारा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला. तसेच त्यांच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा देखील आव्हाडांनी दिला आहे.

बुधवारी आव्हाड यांनी मुंब्र्यातील रहिवाशांसह महापालिका मुख्यालयातील पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात जाब विचारला. या वेळी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी विनोद पवार आणि अतुल कुलकर्णी उपस्थित होते.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कळवा आणि मुंब्र्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांच्या हाता-पाया पडत आहोत, तरीही त्यांना जाग येत नाही. येथे सत्तेत असलेले पाणीपुरवठा मोर्चे काढले जात आहेत; परंतु शासन तुमचे आहे, मग पाणी का दिले जात नाही? पाण्यासाठी मोर्चे काढण्याचे नाटक का? असा आरोप करत मुंब्रा आणि कळव्यातील रहिवाशांना मुद्दामहून पाणी दिले जात नाही; हा एक राजकीय खेळ असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच १० दशलक्ष लीटरची फाईल तयार केली गेली, तरीही ती अद्याप मार्गी लागलेली नसल्याची खंत देखील आव्हाड यांनी व्यक्त केली.

छायाचित्र : दीपक कुरकुंडे
छायाचित्र : दीपक कुरकुंडे

पाणी मिळेपर्यंत नव्या इमारतींना ओसी/सीसी नको

२००२ मध्ये धरण मान्य झाले, मात्र पैशाच्या लोभापायी सत्ताधाऱ्यांना ते काम करता आले नाही. घोडबंदर रोडला पाणी नाही, पाऊस चांगला झाला तरीही ठाण्यात पाणी नाही; आयुक्त येतो, पाहतो, अधिकाऱ्यांना सांगतो, परंतु उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. कॉंक्रीटीकरणाच्या रस्त्यावर २० ते ४० टक्के पाणी मिळते, त्यामुळे तीच कामे केली जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत पाणी सुरळीत देत नाही, तोपर्यंत नव्या इमारतींना ओसी/सीसी मंजूर करू नका, अशी ठोस मागणी आव्हाड यांनी केली आहे.

कळव्यात पाण्यासाठी आक्रोश मोर्चा; महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला

कळवा भागातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, ती लवकरात लवकर सोडविण्यासाठी बुधवारी ठाणे शहर भाजपच्या वतीने महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. तसेच दहा दिवसांत पाणी समस्या सुटली नाही, तर पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला.

महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला
महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवलाछायाचित्र : दीपक कुरकुंडे

कळव्यातील विक्रम नगर, मनीषा नगर, रेल्वे कॉलनी, मच्छी मार्केट, शंकर मंदिर, टाकोळी मोहल्ला, आई नगर, कळवा पूर्व या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई जाणवत आहे. यामुळे कळव्यातील भाजपचे पदाधिकारी आणि माजी उपमहापौर अशोक भोईर यांनी बुधवारी कळवा प्रभाग समिती कार्यालयावर मोर्चा काढला.

महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवला
महिलांनी मडकी फोडून प्रशासनाचा निषेध नोंदवलाछायाचित्र : दीपक कुरकुंडे

पाणी प्रश्न हा कुठल्या पक्षाचा नाही; हा कळवेकर नागरिकांचा आहे. महापालिकेच्या नियोजनाअभावी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दहा दिवसांत ठोस नियोजन झाले नाही, तर नागरिकांचा संताप उग्र होईल आणि पालिका अधिकाऱ्यांना कार्यालयात बसणे मुश्किल होईल. कळवा पूर्वेला पाणी टाकी असूनही त्यात पाणी नाही, टाक्यांना गळती असून प्रशासनाचे नियोजन चुकले आहे. एका भागाला पाणी देऊन दुसऱ्या भागाला वंचित ठेवणे ही भूमिका नागरिक खपवून घेतली जाणार नाही.

संजय केळकर, आमदार

आमदार निरंजन डावखरे यांनीही प्रशासनाला इशारा देत सांगितले की, प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही, तर भाजप कार्यकर्त्यांना कठोर पावले उचलावी लागतील.

logo
marathi.freepressjournal.in