मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मुंब्र्यातील 'नो एंट्री'त वाढ

मुंब्रा वनविभागाच्या जमिनीवरील दर्गा आणि मदरसा यांना १५ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता
मनसे नेते अविनाश जाधव यांच्या मुंब्र्यातील 'नो एंट्री'त वाढ
Published on

मनसे नेते अविनाश जाधव याना मुंब्रा परिसरात ९ एप्रिलपर्यंत ठाणे पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून 'नो एंट्री' केली होती. या कालावधीमध्ये पोलिसांनी पुन्हा वाढ केली असून त्यांना मुंब्रा परिसरात २३ एप्रिलपर्यंत 'नो एंट्री' राहणार आहे. यामुळे ११ एप्रिलला मनसे नेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या सत्कार संभारंभाचे आयोजन मुंब्रा हद्दीत करण्यात आले होते. त्याला पोलिसांच्या वाढीव जमावबंदीमुळे खो मिळाला आहे.

मुंब्रा वनविभागाच्या जमिनीवरील दर्गा आणि मदरसा यांना १५ दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. कारवाई न झाल्यास बाजूलाच हनुमानाचे मंदिर उभारण्याच्या अल्टीमेटमने मुंब्रा परिसरात कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. त्यामुळे ठाणे पोलिसांनी याची गंभीर दाखल घेत थेट मनसे नेते अविनाश जाधव याना ९ एप्रिलपर्यंत मुंब्रा हद्दीत 'नो एंट्री' केली होती. आता बंदीची मुदत संपत असतानाच रमजान महिना सुरू असल्याने आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नियुक्तीबाबत सत्कार संभारंभाचे आयोजन ११ एप्रिल रोजी करण्यात आले होते.

दरम्यान या कार्यक्रमात अविनाश जाधव यांच्याकडून मुंब्र्यामध्ये प्रक्षोभक भाषण केले जाण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने त्या दरम्यान शांततेचा भंग होण्याची शक्यता ठाणे पोलिसांकडून व्यक्त केली जात होती. कळवा मुंब्रा विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विलास शिंदे यांनी मुंब्रा येथे कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू करून २३ एप्रिल २०२३ पर्यंत अविनाश जाधव यांना मुंब्रा येथे 'नो एन्ट्री' केली असल्याची नोटीस अविनाश शिंदे यांना ६ एप्रिल रोजी देण्यात आल्याची माहिती आहे. मुंब्रा परिसरात २३ एप्रिलपर्यंत जमावबंदी करण्यात आल्याने मनसेच्या सत्कार संभारंभावर गदा आलेली आहे.

logo
marathi.freepressjournal.in