
ठाणे : मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत चार प्रवाशांना आपले जीव गमवावे लागले होते. तर यातील दोघा गंभीर जखमींवर ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु त्यातील अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा पाचवर पोहोचला आहे. महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल असलेल्या ७ जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दिवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान सोमवारी ९ जून रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर आठ जखमींना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाला पुढील उपचारासाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलविण्यात आले होते. तर शिवा गवळी आणि अनिल मोरे या दोघा जखमींवर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील मोरे यांची प्रकृती गंभीर होती. अखेर गेल्या १० दिवसांपासून त्यांची मृत्यूशी असलेली झुंज अखेर गुरुवारी सकाळी व्यर्थ ठरली.
मोरे हे शहापूर तालुक्यातील वासिंद येथील सिद्धार्थ नगरचे रहिवासी होते. त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका असून एक मुलगा व एक मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. मोरे हे कळवा येथील मनीषा विद्यालयात शिपाई पदावर कार्यरत होते. त्यांनी ३२ वर्षे सेवा केली होती. अपघाताच्या घटनेनंतर सुमारे १ तास त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही तसेच कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातही सुमारे १ तासाहून अधिक काळ वैद्यकीय मदत मिळाली नसल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.