
कमल मिश्रा / मुंबई
मुंब्रा स्थानकाजवळ घडलेल्या दुर्दैवी घटनेत १३ प्रवासी लोकलमधून खाली पडल्याने मुंबईतील उपनगरी रेल्वे सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. मध्य रेल्वेचे माजी महाव्यवस्थापक व रेल्वे मंडळाचे माजी सदस्य सुबोध जैन यांनी या अपघातावर भाष्य करताना, गर्दीतील आतल्या दबावासह जड बॅकपॅकच्या वाढत्या वापराला जबाबदार ठरवले आहे.
हा अपघात सोमवारी सकाळी मुंब्रा व दिवा स्थानकांदरम्यान घडला. यानंतर दररोज प्रवास करणारे आणि रेल्वे वापरकर्त्यांमध्ये संताप उसळला. अनेक वर्षांपासून ते अपुऱ्या पायाभूत सुविधा, अपुरी ट्रेन संख्या आणि गर्दी नियंत्रणाच्या अकार्यक्षमतेबद्दल तक्रार करत आहेत. अशा प्रकारच्या एकत्रपणे काही प्रवासी पडणाऱ्या अपघातांना सुबोध जैन यांनी ‘‘अत्यंत दुर्मिळ" असे म्हटले. तसेच हे व्यवस्थात्मक अपयशाचे लक्षण असल्याचेही त्यांनी सांगितले. जेव्हा अनेक प्रवासी एकाच वेळी आतून ढकलले गेल्यामुळे खाली पडतात, तेव्हा ती घटना अतिशय असामान्य असते. अशी घटना गर्दी नियंत्रण व ट्रेन क्षमतेच्या नियोजनात गंभीर त्रुटी दाखवते, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, हे अपघात ट्रॅकसंबंधी किंवा बाह्य धडकेतून झालेले नाहीत, तर खूपच जास्त गर्दीमुळे कोचच्या आत झालेल्या दबावामुळे प्रवासी खाली पडले असावेत. "इतकी गर्दी असते की थोड्याशा हालचालीनेही मोठी प्रतिक्रिया उमटू शकते.
माजी रेल्वे अधिकारी जैन यांनी प्रवाशांच्या बॅकपॅक वापर यावरही लक्ष वेधले. गर्दीच्या कोचमध्ये उभ्या असलेल्या प्रवाशांच्या पाठीवर असलेल्या बॅकपॅकमुळे ट्रेनच्या कडेला उभ्या प्रवाशांना धक्का बसून खाली पडू शकतात.
सोमवारी मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघाताची रेल्वे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना ओळखणे हा या तपासाचा उद्देश आहे. पोलिसांनी मंगळवारी जखमी प्रवाशांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली. रेल्वे पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते प्रवासी कोणत्या गाड्यांमधून पडले आणि नेमके काय घडले हे ठरवतील. जखमी प्रवाशांव्यतिरिक्त, प्रत्यक्षदर्शींचे जबाब देखील नोंदवले जातील. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे एका वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.