ठाण्यातील सिग्नल, चौकांचे होणार पुन्हा आरेखन; वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार संभाळल्यानंतर सौरभ राव यांनी सोमवारी पहिलाच पाहणी दौरा केला असून, हा पहिलाच पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यामध्ये क्लस्टर योजनेचा आढावा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्मशानभूमी, रायलादेवी तलाव तसेच महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेचा देखील आढावा घेतला.
ठाण्यातील सिग्नल, चौकांचे होणार पुन्हा आरेखन; वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेचा ॲक्शन प्लॅन

ठाणे : ठाणे शहरातील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेच्या वतीने ॲक्शन प्लॅन तयार केला असून, शहरातील सिग्नल यंत्रणेचे पुनर्आरेखन तसेच चौकांचे पुनर्आरेखन करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक देखील घेण्यात आली असून, वाहतूककोंडीच्या कारणांचा देखील आढावा घेण्यात आला असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

ठाणे महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार संभाळल्यानंतर सौरभ राव यांनी सोमवारी पहिलाच पाहणी दौरा केला असून, हा पहिलाच पाहणी दौरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. या पाहणी दौऱ्यामध्ये क्लस्टर योजनेचा आढावा, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारक, स्मशानभूमी, रायलादेवी तलाव तसेच महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजनेचा देखील आढावा घेतला. महापालिकेत सुरू असलेली विकासकामे ही दर्जात्मक होत असून, या विकासकामांबाबत आयुक्तांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील वाहतूककोंडी कमी करण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने एक ॲक्शन प्लॅन तयार केला असून, यामध्ये शहरातील सिग्नल, चौकांचे रिडिझायनिंग तसेच पुनर्आरेखन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक देखील झाली असून, या बैठकीमध्ये वाहतूककोंडीवर अभ्यास देखील करण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.

क्लस्टरच्या कामाचा आयुक्तांकडून आढावा

आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यात त्यांनी क्लस्टरचा देखील आढावा घेतला असून, या योजनेला गती देण्यासाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. क्लस्टर योजनेचे उद्दिष्ट हे नागरिकांचे राहणीमान उंचावणे यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. क्लस्टरमध्ये पावसाळ्यापूर्वीच कामे करण्यासाठी मंगळवारी सिडको आणि आमची बैठक आहे. पावसाळ्याच्या आधी प्रकल्पाला गती देण्यासाठी ६० दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच क्लस्टरमधील १० इमारतींच्या कामांचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला.

मेट्रोमुळे होणाऱ्या वाहतूककोंडीसाठी समन्वय साधण्याचे निर्देश

ठाणे शहरात एमएमआरडीएच्या माध्यमातून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेचा महत्त्वाचा टप्पा सध्या घोडबंदर भागात सुरू आहे. त्यामुळे घोडबंदर पट्ट्यात विशेष करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. मेट्रोच्या कामाचा आढावा घेताना सर्व यंत्रणाचा समन्वय महत्त्वाचा असल्याचे आयुक्तांनी सांगितले. मेट्रोमुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांची महत्त्वाची भूमिका असते, त्या दृष्टीने योग्य समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांनी केली शाळा; आयुक्तांना दाखवल्या चकाचक वास्तू

महापालिका आयुक्त यांच्या पाहणी दौऱ्यात पालिका अधिकाऱ्यांनी चांगलीच शाळा केली असून, पालिका आयुक्तांनी शहरातील केवळ चकाचक वास्तू दाखवण्यात आल्या असल्याचे उघड झाले आहे. यामध्ये बाळासाहेब ठाकरे स्मारक, वागळे येथे अद्यावत बांधण्यात आलेली स्मशानभूमी तसेच वागळे पट्ट्यातीलच स्वच्छ शौचालय दाखवण्यात आले. याशिवाय आयुक्तांचा दौरा ज्या ज्या ठिकाणी होता या ठिकाणी आधीच रस्ते सफाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयुक्त प्रत्यक्ष जागेवर पोहचण्याच्या आधीच सफाई कर्मचारी रस्त्यांची सफाई करताना दिसले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in