महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंगचे धडे देणार

रोबोट तयार करण्यासाठी आवश्यक मोटर, सेंसर, व्हील, गीअर व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंगचे धडे देणार

भाईंंदर: मीरा-भाईंदर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून रोबोटिक्स व कोडिंगचे धडे देण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेत आवश्यक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी मूलभूत सोयीसुविधा योजनेंतर्गत दोन कोटी रुपयांच्या खर्चास जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी देण्यात आली आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेच्या शहरात ३६ शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास ९ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर शिक्षण देण्याचा प्रयत्न केले जात आहेत. महापालिकेकडून डिजिटल वर्ग, सेमी इंग्रजीत शिक्षण व इतर उपाययोजना केल्या जात आहेत. आठवी ते दहावीचे वर्ग सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे घेण्यासाठी लायब्ररीची आवश्यकता होती. त्यामुळे खासगी शाळांप्रमाणे रोबोटिक्स व कोडिंग प्रशिक्षण मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना देण्याच्या दृष्टीने सोलर ऑपरेटेड रोबोटिक आर्टिफिशियल प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

त्यासाठी महापालिकेने निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रयोगशाळा उभारण्यास दोन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. एका शाळेत प्रयोगशाळा उभारण्यासाठी साडेपाच लाख रुपये एवढा खर्च येणार आहे. प्रयोगशाळा उभारण्यासाठी आर्थिक खर्च मंजुरी मिळाल्यामुळे लवकरच मनपाकडून निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली जाणार आहे. या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांमधील कार्यकुशलता व वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यास मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व मनपा शाळांमध्ये ही प्रयोगशाळा उभारल्या जाणार आहेत.

या प्रयोगशाळेत मनपा विद्यार्थ्यांना रोबोटिक्स म्हणजे काय? रोबोट कसा तयार करायचा? तो तयार करण्यासाठी कोणते साहित्य लागणार याची माहिती दिली जाणार आहे. यासह रोबोट तयार करण्यासाठी आवश्यक मोटर, सेंसर, व्हील, गीअर व इतर साहित्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. याच्या मदतीने विद्यार्थ्यांना रोबोटिक डंपर, क्रेन आदी तयार करता येणार आहे यासह कोडिंग, आर्टिफिशल इंटेलिजंट आदी गोष्टी देखील शिकवल्या जाणार आहेत. त्यासाठी प्रथम शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण संबंधित कंपनीकडून दिले जाणार आहे.

- संजय शिंदे, उपायुक्त मनपा

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in